मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटेच्या सुमारास BMW कारचा भीषण अपघात झाला. मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर रेलिंग तोडून ती थेट पुलावरून खाली कोसळली. सुमारे ७५ फूट खाली कोसळलेल्या या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये शनय गजर (वय २१), आदित्य जकासानिया (वय १९) आणि धैर्य सेठ (वय १७) यांचा समावेश आहे. तर आदित्य ओसवाल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर कोस्टल रोड परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.
नेमका अपघात कसा झाला?
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही BMW कार मरीन ड्राईव्हच्या दिशेने येत हाजीअलीच्या दिशेने जात होती. प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक होता. भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली.धडकेनंतर कारने रेलिंग तोडले. यावेळी रेलिंगजवळील लाईटचा खांब आणि दिशादर्शक फलकाचेही नुकसान झाले. त्यानंतर कार थेट पुलावरून खाली कोसळली. उंचावरून खाली आदळल्यामुळे कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त वाहनाची अवस्था पाहता धडक किती भीषण होती, याचा अंदाज येत आहे.
कारचा वेग १०० किमीपेक्षा अधिक?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघाताच्या वेळी BMW कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाहनाचा नेमका वेग किती होता, हे तांत्रिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. कोस्टल रोडवर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अपघातात वेगाची भूमिका किती होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कारमधील एअरबॅग्ज अपघातानंतर उघडल्या होत्या. मात्र, वाहन पुलावरून खाली कोसळल्याने धडकेची तीव्रता प्रचंड होती. कारमधील एका तरुणाचा मृतदेह वाहनापासून सुमारे २० फूट अंतरावर आढळल्याची माहिती आहे, तर आणखी एक जण कारच्या बाहेर पडलेला आढळून आला.
शनयचा पाय ॲक्सिलरेटरवरच राहिला
या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कार चालवत असलेल्या शनय गजरचा मृत्यू झाला असतानाही त्याच्या शरीराचा काही भाग कारमध्येच अडकलेला होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शनयचा पाय मृत्यूनंतरही कारच्या ॲक्सिलरेटरवर असल्याचे दिसून आले. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.
मद्यपान केले होते का? रक्ताचे नमुने तपासणीसाठी
अपघाताच्या वेळी कारमधील तरुणांनी मद्यपान केले होते का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मृतांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालातून अपघाताच्या वेळी चालक किंवा कारमधील अन्य व्यक्तींनी मद्यपान केले होते का, याबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.मृतांचे शवविच्छेदन नायर रुग्णालयात करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि रक्त नमुन्यांच्या फॉरेन्सिक अहवालानंतर तपासाला अधिक दिशा मिळणार आहे.
पहाटेची वेळ असल्याने अपघाताची माहिती उशिरा मिळाली
हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. त्यावेळी कोस्टल रोडवर वाहनांची वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे अपघात झाल्यानंतर काही काळ ही घटना लक्षात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यास काहीसा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.ताडदेव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकानेही वाहनाची आणि घटनास्थळाची पाहणी केली आहे.
चौघेही अहमदाबादचे; शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्य
अपघातातील चौघेही मूळचे गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी असल्याची माहिती आहे. शिक्षणासाठी ते मुंबईत राहत होते. शनय गजर आणि आदित्य ओसवाल हे कुर्ल्यातील एका महाविद्यालयात आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होते. तर धैर्य सेठ आणि आदित्य जकासानिया हे पश्चिम उपनगरातील एका नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.हे चौघेही सांताक्रूझ आणि जुहू परिसरात हॉस्टेल किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
BMW सिल्वासामधील असल्याची प्राथमिक माहिती
अपघातग्रस्त BMW कार गुजरातमधील सिल्वासा येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. वाहनाची मालकी, ते कोणाच्या नावावर आहे, अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होते आणि कारमध्ये नेमके किती जण होते, याबाबतही तपास सुरू आहे.
सध्या पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची तांत्रिक स्थिती, कारचा वेग आणि फॉरेन्सिक अहवाल या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. चालकाचे नियंत्रण नेमक्या कोणत्या कारणामुळे सुटले, हा या तपासातील महत्त्वाचा मुद्दा आहे.दरम्यान, कोस्टल रोडसारख्या वेगवान वाहतुकीच्या मार्गावर वाहन चालवताना वेगमर्यादेचे पालन आणि सुरक्षिततेच्या नियमांचे महत्त्व या दुर्घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. अपघाताचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.