मिरज : मिरज शासकीय रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या नवीन प्रवेशद्वाराच्या बांधकामादरम्यान सोमवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. प्रवेशद्वारासाठी उभारण्यात आलेली कच्ची कमान अचानक कोसळल्याने सात कामगार जखमी झाले. यातील एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. मात्र, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी नंतर सर्व सात जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
रुग्णालयाच्या आवारात वॉल कंपाऊंड आणि नवीन प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. सोमवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू असताना हा प्रकार घडला. बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या सांगाड्यावर सिमेंट, वाळू आणि हॉटमिक्सच्या साहाय्याने काम सुरू असतानाच संपूर्ण रचना अचानक कोसळली.
कमान कोसळताच त्याखाली काही कामगार अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस आणि रुग्णांचे नातेवाईक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत सात कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर काही काळ रुग्णालय परिसरात मोठी गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, कमान नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, बांधकामासाठी उभारण्यात आलेली संरचना कितपत सुरक्षित होती आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत तपास सुरू आहे. बांधकामाच्या दर्जाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.