सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 क्राईम

सत्तरीतील प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; प्रियकराची हत्या करून शेतात मृतदेह पुरला, वृद्ध महिलेला अटक

डिजिटल पुणे    21-09-2026 18:08:30

सोलापूर : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. मात्र, पंढरपूर तालुक्यात सत्तरीच्या उंबरठ्यावर फुललेल्या प्रेमसंबंधाचा अत्यंत धक्कादायक शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर 70 वर्षीय अंबादास खांडेकर यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगल होनमाने या वृद्ध महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेह शेतात अर्धवट जाळून पुरण्यात आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही वृद्ध असूनही त्यांच्यातील हे संबंध परिसरात चर्चेचा विषय होते. मात्र, काही कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून अंबादास यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.

 शेतात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

ही घटना 27 जुलैच्या आसपास घडल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. मात्र, घटनेनंतर काही दिवस या प्रकरणाची माहिती समोर आली नव्हती. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी शेत परिसरात काही नागरिकांना अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पुरलेला दिसून आला. संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे गोळा करून मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अंबादास खांडेकर बेपत्ता असल्याचे समोर

दरम्यान, पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता अंबादास खांडेकर काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शेतात आढळलेला मृतदेह अंबादास यांचाच असण्याची शक्यता पोलिसांनी तपासली.

मृतदेहाची निश्चित ओळख पटवण्यासाठी अंबादास यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने घेण्यात आले. डीएनए तपासणीनंतर शेतात आढळलेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला.

 तपासाची चक्रे वेगाने फिरली

मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांनी अंबादास यांच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांच्या हालचाली आणि शेवटच्या काळातील संबंध यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मंगल होनमाने यांच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.

पोलिसांनी मंगल होनमाने यांची चौकशी केली. त्यानंतर या हत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. प्रेमसंबंध आणि त्यातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंबादास यांची हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस तपासात समोर आला आहे.

 हत्येमागील नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात

अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्या वादाचे रुपांतर हत्येत कसे झाले, याचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे.

सत्तरीच्या वयात सुरू झालेल्या प्रेमसंबंधाचा अशा पद्धतीने शेवट झाल्याने या घटनेची पंढरपूर तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. अंबादास यांच्या हत्येमागील नेमके कारण, घटनेतील इतर बाबी आणि हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागील घटनाक्रम याचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती