पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेली हवामान प्रणाली अधिक तीव्र झाली असून, तिचे रूपांतर ‘डीप डिप्रेशन’मध्ये झाले आहे. या प्रणालीमुळे ओडिशा आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, या प्रणालीचा अप्रत्यक्ष प्रभाव महाराष्ट्रातील हवामानावरही जाणवण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भात 23 ते 26 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली तीव्र
बंगालच्या उपसागरातील वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया पश्चिम-वायव्य दिशेने सरकत 21 सप्टेंबरला डिप्रेशनमध्ये बदलले. त्यानंतर या प्रणालीची तीव्रता वाढून ती ‘डीप डिप्रेशन’मध्ये रूपांतरित झाली. ही प्रणाली पुढे पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असून, 23 सप्टेंबरच्या रात्री ते 24 सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान पोहोचण्याचा अंदाज आहे.
‘डीप डिप्रेशन’ किती धोकादायक?
‘डीप डिप्रेशन’ ही चक्रीवादळाची श्रेणी नसली तरी सामान्य डिप्रेशनपेक्षा ती अधिक तीव्र हवामान प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये जोरदार वारे, मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. प्रणालीची दिशा आणि तीव्रता यानुसार तिचा प्रभाव वेगवेगळ्या भागांत कमी-अधिक प्रमाणात जाणवतो.
ओडिशा-आंध्र प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ओडिशा आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशात या प्रणालीचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबरपासून या भागांत जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, 23 आणि 24 सप्टेंबरला काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रावर थेट चक्रीवादळाचा धोका नाही
बंगालच्या उपसागरातील ही प्रणाली पश्चिमेकडे सरकल्याने मध्य भारतातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर या प्रणालीचा थेट चक्रीवादळासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही. तरीही राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
विदर्भासाठी 23 ते 26 सप्टेंबर हा कालावधी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. 23 आणि 24 सप्टेंबरला विदर्भात मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा आहे. 25 आणि 26 सप्टेंबरलाही काही भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
22 सप्टेंबरला राज्यात कुठे पावसाची शक्यता?
22 सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ: गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळसह सर्व जिल्हे.
मराठवाडा: हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव.
मध्य महाराष्ट्र: सोलापूर, पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूरचा घाट परिसर.
कोकण: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
दरम्यान, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
23 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाचा जोर
23 सप्टेंबरला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. त्याच दिवशी विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
24 सप्टेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला विदर्भातील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची हजेरी
कोकण आणि गोवा विभागात 22 आणि 23 सप्टेंबरला मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा आहे. 24 सप्टेंबरला काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. मात्र, 25 सप्टेंबरनंतर सध्या या विभागासाठी विशेष पावसाचा इशारा नाही.मध्य महाराष्ट्रात 22 आणि 23 सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता असून, 24 सप्टेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्यानंतर सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
मराठवाड्यात 22 आणि 23 सप्टेंबर महत्त्वाचे
मराठवाड्यात 22 सप्टेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 23 सप्टेंबरला काही भागांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. 24 सप्टेंबरनंतर सध्या या विभागासाठी स्वतंत्र पावसाचा इशारा नाही.त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांना कितपत दिलासा मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.