मिरज : मिरज शासकीय रुग्णालयात बांधकाम सुरू असताना आरसीसी स्लॅबचा मोठा भाग अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत पश्चिम बंगालमधील सात कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. अचानक झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नागरिक, रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सातही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
रुग्णालयाच्या नव्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूचा मोठा आरसीसी स्लॅब अचानक कोसळला. सिमेंटचे अवजड ढिगारे आणि लोखंडी सळ्यांखाली सात कामगार अडकले. मोठा आवाज होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आणि बचावासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वेळ न दवडता ढिगारा हटवण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींनीही मदतीसाठी धाव घेतली. ढिगाऱ्याखालून कामगारांचे आवाज येत असल्याने बचावकार्याला आणखी वेग देण्यात आला.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, मिरज ग्रामीणचे निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्यासह पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. लोखंडी सळ्या कापून तसेच सिमेंटचे ढिगारे बाजूला करून कामगारांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
अखेर सातही कामगार सुखरूप बाहेर
दीर्घ प्रयत्नांनंतर एकामागून एक सातही कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. संकटाच्या क्षणी स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमदार इद्रिस नायकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपाधीक्षक अजय कोकाटे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह विविध अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्याची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
दरम्यान, दुर्घटनेनंतर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. संबंधित ठेकेदारासह रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.बांधकामाच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांनीही केली. यावेळी विलास देसाई, सामाजिक कार्यकर्ते धनंजय भिसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
‘मिरज सिव्हिल’मध्ये घडलेली दुर्घटना दुर्दैवी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, दुर्घटनेची चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मोठा स्लॅब अचानक कोसळल्याने सात कामगारांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, नागरिक आणि प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.