सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 जिल्हा

मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी उपसमिती, मुंबई मेट्रोसाठीही महत्त्वाचा निर्णय

डिजिटल पुणे    22-09-2026 17:15:26

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी आणि विविध विकासकामांशी संबंधित पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, शेतकरी, मुंबई मेट्रो, गृहनिर्माण आणि कृषी विभागाशी संबंधित पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

1. दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

 

परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेण्यासाठी या उपसमितीला अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या शनिवारपर्यंत यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना काढली जाणार आहे.

2. मुंबई मेट्रो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विकसित भूखंड

मुंबई मेट्रो मार्ग 4, 4 अ आणि 10 यांच्या एकात्मिक कारशेड डेपोसाठी जमीन दिलेल्या मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक 30 मधील पात्र शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये 22.5 टक्के आणि 12.5 टक्के प्रमाणात विकसित भूखंड वाटप करण्यात येणार आहेत.

3. खारमधील म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास

मुंबईतील खार पश्चिम येथील रामकृष्णनगर परिसरातील म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या समूह पुनर्विकासाला मंजुरी देण्यात आली आहे.

परिसरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून सुरक्षित आणि नियोजित गृहनिर्माणाला चालना मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

4. धुळे येथील क्रीडांगण आणि बगीच्याचे आरक्षण रद्द

धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर येथील सर्व्हे क्रमांक 103 वरील क्रीडांगण आणि बगीच्याचे आरक्षण रद्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा भूभाग सार्वजनिक-निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

5. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सन 2009 मध्ये मंजूर झालेला आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्यात येणार आहे.

नवीन सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव तयार करण्यापूर्वी कृषी विभागातील उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणेची गरज, शेतकरीकेंद्रित योजनांचा कार्यभार आणि भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती