पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि विद्यार्थी वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
पुण्यातील शास्त्री रोड परिसरात कलम 163 लागू असल्याने तसेच हा परिसर गर्दीचा असल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचे रोहित पवारांना कळवले आहे. पुणे पोलिसांकडून सध्या कोणत्याही आंदोलनाला किंवा मोर्चाला परवानगी दिली जात नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
27 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा रोहित पवारांचा निर्धार
पोलिसांनी 26 सप्टेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता गरवारे रोडवर आंदोलन करणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करायची असल्यास 15 विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
MPSC अध्यक्षांचा राजीनामा, ऑफलाइन परीक्षा घेणे आणि रखडलेली सुमारे 70 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करणे, अशा मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच तुकाराम मुंढे आणि सुनील गेडाम यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना आयोगाचे अध्यक्ष करण्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
'आंदोलन दडपण्याचा प्रयत्न'
आंदोलनाशी संबंधित काही विद्यार्थ्यांना नोटिसा देण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. 70 ते 80 विद्यार्थ्यांना नोटिसा देण्यात आल्याचे सांगत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन ठिय्या स्वरूपात सुरू राहू शकते, तसेच काही विद्यार्थी उपोषणाच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
MPSC अध्यक्षांविरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्याविरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या मान्य झाल्यास सरकारचा जाहीर सत्कार करू, असेही त्यांनी म्हटले. सरकारने आंदोलन सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधींनाही आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विनंती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता MPSCच्या मागण्यांवरून होणाऱ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.