सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 क्राईम

मुलीच्या प्रेमविवाहाची ‘शिक्षा’; कुटुंबाला दंड, मारहाण अन् सामाजिक बहिष्काराचा आरोप, धामोरीतील जातपंचायतीविरोधात पोलिसांत तक्रार

डिजिटल पुणे    23-09-2026 12:51:56

अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे मुलीने समाजातीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका कुटुंबाला जातपंचायतीने सामाजिक बहिष्कृत केल्याचा आरोप समोर आला आहे. कुटुंबावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी ५० हजार रुपये कर्ज काढून भरल्यानंतर उर्वरित रक्कम न दिल्याने कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याशी सामाजिक संबंध तोडण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मुलीने सज्ञान अवस्थेत समाजातीलच एका तरुणासोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, समाजाच्या पारंपरिक रितीरिवाजानुसार विवाह झाला नसल्याचे सांगत जातपंचायतीने कुटुंबाला बैठकीसाठी बोलावले. या बैठकीत दंडाची रक्कम निश्चित करण्यात आल्याचा आरोप आहे.

कुटुंबीयांनी दंडापोटी ५० हजार रुपये कर्ज काढून दिले. मात्र, उर्वरित रक्कम देणे शक्य झाले नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. काही काळानंतर समाजातील लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांची आमंत्रणे बंद झाल्याने आपल्यावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

‘आमंत्रणे बंद झाली तेव्हा बहिष्कार कळला’

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने केलेला विवाह नोंदणीकृत असतानाही जातपंचायतीकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला. कुटुंबाला समाजाच्या बैठकीसाठी बोलावून पैशांची मागणी करण्यात आली. रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी समाजातील लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांसाठी येणारी आमंत्रणे पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचे समजल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबाशी कुणीही बोलू नये, त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांना आमंत्रित करू नये, तसेच सामाजिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल, असा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही कुटुंबाला सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अंनिसकडून पोलिसांत धाव

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाशी संपर्क साधला. जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी कुटुंबीयांसह कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून ते सुया-फण्या विकून उदरनिर्वाह करत असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले. अशा परिस्थितीतही कुटुंबाने कर्ज काढून ५० हजार रुपये दिल्याचा दावा त्यांनी केला.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात महाराष्ट्रातील सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान, ‘मुलीने केलेला विवाह कायदेशीर असतानाही जातपंचायतीने दंड ठोठावून कुटुंबाला बहिष्कृत केले,’ असा आरोप अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे. आता या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी होऊन पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती