पुणे : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लाभार्थी यादीत आता ‘हिंदू लिंगायत’ आणि ‘वीरशैव लिंगायत’ या दोन समाजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या समाज समुहातील ज्या जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशा विद्यार्थी, युवक व नागरिकांना अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे .
२० ऑगस्ट २०२६ रोजी शासनाने तसे परिपत्रक काढून हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत या दोन समाजांना अमृतच्या लाभार्थी यादीत समावेश केले आहे .अमृतच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी, एम्स यांसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजनांच्या निकषानुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.
याशिवाय यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आर्थिक सहाय्याच्या योजना उपलब्ध आहेत. तसेच तांत्रिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कौशल्यविकास, स्टार्टअप व उद्योजकतेशी संबंधित विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे .
शासनाच्याकडून काही मागणी/मागण्या मान्य करून घेणे हे किती जिकिरीचे असते याची कल्पना आपल्या सर्वांना आहे . म्हणूनच खडकाळ जमिनीवर काही जरी उगवले तरी होणारा आनंद जेवढा अवर्णनीय असतो तेवढाच आनंद या परिपत्रकाच्या अनुषंगाने समाज बांधवांना होणे हे क्रमप्राप्त होते आणि तसे घडले सुद्धा.
असाच आनंद मला ही झाला . या आनंदाच्या भरतीला एकदम काही शंकारोपण करून अवलक्षण करण्या पेक्षा " हे ही नसे थोडके " या नीतीने मी सुध्दा आनंद व्यक्त करणाऱ्यांच्यात सामील झालो . परंतु राहवले नाही म्हणून .... या घटनेचे उचित स्वागत करून आणि सरकारचे आभार मानून आता थोडेसे लिहून काही सुचवावेसे वाटते आहे .
राज्य शासनाच्या परिपत्रकात " हिंदू लिंगायत " व " वीरशैव लिंगायत " असे दोन वेगवेगळे शब्द वापरले गेले आहेत. थोडक्यात शासनाने दोन शब्द वापरून दोन विभिन्न अस्तित्वे (entities ) उजागर केली आहेत जे की पूर्णत: चुकीचे आहे .
या परिपत्रकामुळे " हिंदु लिंगायत "व "वीरशैव लिंगायत "अशा दोन स्वतःची स्वतंत्र ओळख असलेल्या किंवा भौतिक/वास्तविक अस्तित्व असलेल्या वेगवेगळ्या संस्था/समाज (Entities ) वाटत आहेत जे की सर्वथा चुकीचे, अक्षम्य,गैर व निषेधार्ह आहे .परिपत्रकात एकाच अर्थाच्या शब्दांची दोनदा झालेली योजना (placement ) ही वीरशैव लिंगायत समाजाच्या अभ्यासाविषयी असलेल्या सरकारी अनास्थेचे द्योतक जशी ठरते तशीच सरकारला परिपत्रक काढण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या अभ्यासकांच्या/ विचारवंतांच्या/ सल्लागारांच्या प्रति " आत्यंतिक कीव " व्यक्त करणारी सुध्दा ठरते.
वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्माचा एक घटक आहे हे त्रिवार सत्य आहे .याच सत्याला अनुलक्षून हिंदु कोड बिलात "वीरशैव लिंगायतांना " हिंदु धर्मात समाविष्ट करण्यात आले असून हिंदु कायद्यांत सुद्धा " वीरशैव लिंगायतांचा " समावेश हिंदूंमध्ये करण्यात आलेला आहे . म्हणजेच" वीरशैव लिंगायत " अशी ओळख कोणी सांगत असताना " वीरशैव लिंगायत" हे आपोआप (By default )" हिंदु" ठरतात असे असताना " हिंदु लिंगायत " व " वीरशैव लिंगायत " हे दोन्ही शब्द एकामागून एक वापरून सरकारने केलेली शाब्दिक द्विरुक्ती ही अनाठायी , अनाकलनीय व पुरेश्या तात्विक/ कायदेशीर / सामाजिक माहितीच्या अभावातून घडलेला प्रमाद वाटतो .प्रमाद शब्द याचसाठी वापरत आहे की "वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे " असे बुध्दीभेदी तार्किक मांडणारे काही महाभाग आमच्या जातीसमुहात " हिंदु लिंगायत " ही एक स्वतंत्र जात किंवा पोटजात आहे असे नॅरेटिव्ह सेट करत असतानाच त्या नॅरेटिव्हला पोषक स्थिती शासनाकडून अजाणतेपणाने का होईना निर्माण केली जात आहे जी सामाजिक हिताला बाधक आहे .
समाजातील कित्येक घटकांच्या ट्रान्स्फर सर्टिफिकीटवर/ स्कूल लिव्हींग सर्टिफिकीटवर आजही "हिंदु लिंगायत" म्हणून नोंदी आहेत , ज्या नोंदी स्वतंत्र "वीरशैव लिंगायत" धर्म मागणीच्या मार्गातील अडथळा ठरत आहेत किंबहुना वीरशैव लिंगायतांचे हिंदुत्वाशी असलेल्या नाळेचे ते जितेजागते पुरावे आहेत. अशावेळी वीरशैव लिंगायतांत कागदोपत्री असलेले " हिंदू लिंगायत" हे स्वतंत्र धर्मातील पोटजात स्वरूपात दाखवण्याची Manipulated Strategy ( चालाखीची रणनीती ) काही महाभागांकडून अवलंबिली जात आहे आहे .
हिंदू धर्मातच "वीरशैव लिंगायत "समाविष्ट असताना वीरशैव लिंगायतातील " हिंदु लिंगायत" ही जात दाखवणे म्हणजे जन्मदात्या बापाला पोटच्या पोराच्या पोटीचे "अपत्य" दाखवण्यासारखे व इतके हास्यास्पद व निर्लज्जपणाचे आहे .
म्हणूनच शासनाचा पत्रकातील " हिंदु लिंगायत" व " वीरशैव लिंगायत" हे शब्द विरोधाभासी नसले तरी स्वतंत्र स्वरूपात लिहील्या गेल्यामुळे शब्दभिन्नतेच्या ("Differentiation" च्या ) पार्श्वभूमीवर संधीसाधू बुद्धीभेद्यांना वाव देणारे , स्पष्टता हरवलेले आणि विशिष्ट नॅरेटिव्हला परिपूरक वाटतात .
यावर मग उपाय काय ? परिपत्रकात काय सुधारणा अपेक्षित आहे?
परिपत्रकात केवळ " हिंदू लिंगायत " शब्द आला म्हणून माझे काही हिंदुत्ववादी मित्र जरुर हुरळून जातील परंतु "लिंगायत " शब्दाच्या मागे "हिंदू "लावले काय किंवा " वीरशैव लिंगायत " शब्दाच्या मागे " हिंदु "न लावले काय " वीरशैव लिंगायत" हे " हिंदू" आहेत या त्रिवार सत्यात (Universal truth मध्ये ) यत्किंचितही फरक पडत नाही. याजसाठी " हिंदु लिंगायत " आणि " वीरशैव लिंगायत" या द्विरुक्तीतून कुठलेही चुकीचे नॅरेटिव्ह जन्माला येण्या अगोदरच शासनाने या विषयात स्पष्टोक्ती करणे किंवा सुधारणा करणे हे त्वरित अपेक्षित वाटते .
वीरशैव लिंगायत हा हिंदु समाजातील एक पंथ/ संप्रदाय असल्यामुळे हिंदु शब्द हा इतके दिवस अध्याहृत होता / अनुस्यूत होता , त्यामुळेच वीरशैव लिंगायत शब्दाच्या मागे " हिंदु " शब्द लावायची गरज भासली सुध्दा नव्हती . थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर हातच्या कंकणाला आरसा दाखवायची गरज नव्हती म्हणूनच गरज भासली नव्हती ; परंतु अस्तित्वात नसलेल्या व कधीच अस्तित्वात येऊ न शकणाऱ्या "स्वतंत्र धर्म संकल्पनेचा " समाजभेदी व राष्ट्रहिताला घातक असा "बुद्धिभेद " गेल्या काही दिवसांत काही जणांकडून केला गेला आणि नाईलाजाने वीरशैव लिंगायत शब्दामागे " हिंदु " शब्द लिहीण्याचा प्रघात एक आपतधर्म म्हणून रुढ करायला लागला .
वीरशैव लिंगायत " हिंदु " नाहीत हे सांगणारे षडयंत्र जसे रचले गेले तसेच " वीरशैव " वेगळे आणि " लिंगायत " वेगळे असा शब्दभेद करून वीरशैव लिंगायत समाजात फाळणी करणारे कारस्थान सुद्धा शिजवले गेले . सुदैवाने वीरशैव लिंगायत समाजातील काही जागृत कार्यकर्त्यांनी/ धर्माचार्यांनी पुर्ण ताकदीनिशी हा बुद्धिभेद हाणून पाडला परंतु तरी सुद्धा " वीरशैव लिंगायत हिंदूच आहेत " या वास्तवाचे भान समाज बांधवांना आणून देणे ही अजुनही काळाची गरज आहे .वास्तविक पाहता " वीरशैव " शब्दाचे आचरण वाचक/ पर्यायवाचक / संस्कार वाचक नामाभिधान म्हणजे " लिंगायत " शब्द . त्यामुळे " वीरशैव " व " लिंगायत " हे वेगळे असायचे कारणच नाही.
"लिंगायत " शब्द कधी पासून रूढ झाला ?
. म. बसवेश्वरांच्या किंवा तत्कालीन शिव शरणांच्या संपूर्ण साहित्यात 'लिंगायत' हा शब्द धर्म या अर्थाने कुठेच आलेला नाही स्वाभाविकपणे हा शब्द वापरात देखील नव्हता.अरबी भाषेत 'आयत' म्हणजे धारण करणे. बहामनी शासनाच्या काळात लिंग धारण करणाऱ्यांना 'लिंगायत' असे म्हटले जाऊ लागले. म्हणून " लिंगायत " हा अरबी बोली भाषेतील शब्द आहे. पुढे हा शब्द ब्रिटिश काळात रेकॉर्ड वर आला.
तरीसुद्धा लिंग धारण करणे हे बसवपुर्व काळापासून (महाभारत काळातही उल्लेख सापडतो ) चालत आले आहे आणि असे लिंग धारण करणाऱ्यांना वीरशैव म्हटले जाते/ जायचे. तोच पुरातन / प्राचीन काळापासून चालत आलेला आपला " वीरशैव लिंगायत " संप्रदाय होय .
"वीरशैव लिंगायत " हा शब्द बऱ्याच वेळा एकत्र वापरला जातो. आता पुन्हा प्रश्न पडेल ! दोन्ही समान अर्थाचे शब्द आहेत तरी सुद्धा " वीरशैव लिंगायत " एक शब्द कसा (शब्द दोन असूनही ) ?
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की "वीरशैव लिंगायत " हा मराठी व्याकरण दृष्ट्या " विशेषण उभयप्रद कर्म धारय तत्पुरुष समास " आहे .जसे की थट्टा मस्करी ,पांढरा शुभ्र ,आईमाता ,नंदीबैल ,काळा कुट्ट
सदा सर्वदा वगैरे व आदी नित्य वापरातील मराठी शब्द तसे "वीरशैव लिंगायत "यात दोन समान अर्थाची विशेषणे एकत्र येऊन एकच शब्द (त्याच विशेषणाचा बोध करणारा ) तयार झाला आहे .
म्हणूनच
"हिंदू लिंगायत "म्हणा ,
"हिंदू वीरशैव म्हणा",
फक्त"लिंगायत"म्हणा ,
फक्त "वीरशैव "म्हणा ,
"वीरशैव लिंगायत"म्हणा ,
किंवा " हिंदु वीरशैव लिंगायत "म्हणा .
हे सर्व शब्द समानार्थी आहेत .
" हे सर्व शब्द समानार्थी आहेत "असे यथार्थ ज्ञान शासनाला देऊन परिपत्रकात या सर्व समानार्थी शब्दांचे समानार्थीत्व प्रकट करणारे , परिपत्रकातील घडलेली एकाच अर्थाच्या दोन भिन्न शब्दांची द्विरुक्ती टाळणारे आणि " हिंदु वीरशैव लिंगायत " हा एकच शब्द लिहून "हिंदू" मधील समावेशत्व / अंतर्भावत्व अधोरेखित करणारे बदल या परिपत्रकात घडणे आवश्यक वाटते.
तसेच इथून पुढची या समाजाच्या विषयीची परिपत्रके काढताना सरकारने काही काळजी घेणे सुध्दा आवश्यक वाटते .वीरशैव , हिंदु वीरशैव , लिंगायत , हिंदु लिंगायत , वीरशैव लिंगायत , हिंदु वीरशैव लिंगायत हे सर्व शब्द एकाच उपासना पध्दतीचे द्योतक असल्याने वीरशैव = हिंदू वीरशैव = लिंगायत = हिंदू लिंगायत = वीरशैव लिंगायत = हिंदू वीरशैव लिंगायत हे समीकरण सरकारने समजावून घेऊन यांपैकी कोणत्याही संस्करणाने युक्त असलेल्या जाती- पोटजातीला विविध आरक्षणां च्या यादीतील विविध जाती-पोटजातींना मिळत असलेले फायदे Respectively ( अनुक्रमे व संबंधितपणे ) मिळावेत . असे घडले तर कागदोपत्रात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या परंतु प्रत्यक्षात एकच उपासना पध्दत असलेल्या आपल्या समाजबांधवांना निश्चितच दिलासा मिळेल असे वाटते .
— शरद बबनराव गंजीवाले
दूरध्वनि क्र .- ९८८१९०९७४८