पुणे : आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 11 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
20 आणि 21 जुलै 2026 रोजी आंबेगाव पठार पोलीस चौकीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे संकेत सतीश गोसावी यांनी तक्रार दिली. मानवी हक्क आयोगाच्या सुमोटो प्रकरण क्रमांक 4848/13/23/2026 आणि 4774/13/23/2026 मधील आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
20 जुलै रोजी चार अल्पवयीन मुलांना आंबेगाव पठार पोलीस चौकीत आणण्यात आले, तर 21 जुलै रोजी आणखी चार मुलांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आहे. या आठही मुलांना नियमानुसार बालकल्याण समितीसमोर हजर न करता ताब्यात ठेवण्यात आले. तसेच त्यांना पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यातील काही मुलांना तीन दिवसांपर्यंत डांबून ठेवण्यात आल्याचेही प्रकरणात नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात अल्पवयीन मुलांना कारच्या बोनेटला बांधून मारहाण केल्याचा आरोपही संबंधित पोलिसांवर करण्यात आला आहे.
जातीवाचक शिवीगाळीचाही आरोप
प्रकरणातील अल्पवयीन मुलांपैकी चार जण अनुसूचित जातीतील असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच, मारहाणीच्या खुणा वैद्यकीय तपासणीत दिसू नयेत यासाठी पुरावे दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची चौकशी आता सीआयडीकडून केली जात आहे.
11 पोलिसांवर गुन्हा
या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह एकूण 11 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1. मानसिंग पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक
2. गणेश मोहिते – सहाय्यक पोलीस निरीक्षक
3. स्नेहल थोरात – सहाय्यक पोलीस निरीक्षक
4. निलेश मोकाशी – पोलीस निरीक्षक
5. सुनिल हनवटे – पोलीस हवालदार
6. दिनेश टापके – पोलीस हवालदार
7. मितेश चोरमोले – पोलीस अंमलदार
8. सागर बोरसे – पोलीस अंमलदार
9. सोहम रोडेकर – पोलीस अंमलदार
10. मंगेश पवार – पोलीस अंमलदार
11. स्वप्ना भिसे – महिला पोलीस अंमलदार
कोणत्या कलमांनुसार गुन्हा?
संबंधित पोलिसांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115(2), 120, 127(2), 127(3), 131, 352, 351(2), 198, 199, 336(2) आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, 2015 मधील कलम 74 आणि 75 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 मधील कलम 3(1)(e), 3(1)(r), 3(1)(u), 3(1)(z) आणि 3(2)(vii) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
राज्य मानवी हक्क आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पुण्याचे पोलीस आयुक्तांसह संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्यांना स्थगिती मिळाल्याने या दोघांना सध्याच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुनील रामनंद करत आहेत. सीआयडीच्या तपासानंतर या प्रकरणातील आरोपांबाबत पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.