सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

३,५०० CCTV कॅमेऱ्यांतून पुण्यावर २४ तास नजर; कमांड सेंटरमधून विसर्जन मिरवणुकीचे थेट मॉनिटरिंग, पोलीस ॲक्शन मोडमध्ये

डिजिटल पुणे    24-09-2026 16:37:43

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहराच्या सुरक्षेसाठी कंबर कसली असून, यंदा तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील तब्बल ३,५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास निगराणी ठेवण्यात येत आहे. त्यात विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवर नव्याने बसवण्यात आलेल्या सुमारे ४०० कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

प्रमुख गणेश मंडळे, मिरवणुकीचे मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाचे चौक यावर नियंत्रण कक्षातून सतत नजर ठेवली जाणार आहे. एखादी संशयास्पद हालचाल किंवा संवेदनशील घटना निदर्शनास आल्यास संबंधित पोलिस पथकांना तातडीने माहिती देऊन आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

कमांड सेंटरमधून संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील गर्दी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील परिस्थितीचा आढावा घेणे, बंदोबस्तातील पोलिसांना आवश्यक सूचना देणे आणि परिस्थितीनुसार पोलिसांची तैनाती बदलणे, अशी कामे या केंद्रातून केली जाणार आहेत.लाखो भाविक मिरवणुकीसाठी रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने गर्दीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षातील यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

AI आणि नाईट व्हिजन कॅमेऱ्यांची मदत

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरील कॅमेरे नाईट व्हिजन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या माध्यमातून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना अलर्टच्या स्वरूपात मिळणार आहे.फेस रेकग्निशनच्या माध्यमातून पोलिसांच्या रेकॉर्डमधील व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत होणार असून, संबंधित व्यक्तीबाबत उपलब्ध गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहितीही पोलिसांना तपासता येणार आहे.

संशयास्पद वस्तूंवरही कॅमेऱ्यांची नजर

गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळणे, शस्त्रासह व्यक्तीची हालचाल किंवा अन्य संवेदनशील घटना घडल्यास यंत्रणेकडून नियंत्रण कक्षाला अलर्ट मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस पथकांना तातडीने माहिती देण्यात येणार आहे.

गर्दी किती? AI सांगणार अचूक चित्र

विसर्जन मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पीपल काउंटिंग तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. बेलबाग चौक आणि अलका टॉकीज चौक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची संख्या आणि गर्दीची स्थिती यावर सतत लक्ष ठेवले जाणार आहे.गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यानुसार वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यास या यंत्रणेची मदत होणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन

पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीसाठी सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. पारंपरिक पोलिस बंदोबस्तासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.CCTV, AI, फेस रेकग्निशन आणि कमांड सेंटरच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीवर ठेवली जाणारी ही हायटेक नजर पुणे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती