सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

पुण्यात आज गणेश विसर्जनाचा जल्लोष! कसबा गणपतीपासून दगडूशेठपर्यंत मिरवणुकीची लगबग; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त

डिजिटल पुणे    25-09-2026 11:18:12

पुणे : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुणे शहरात आज गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा, तसेच भाविकांची गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख विसर्जन मार्गांसह विविध भागांत तब्बल १० हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार आहेत.

कसबा गणपतीच्या मिरवणुकीकडे पुणेकरांचे लक्ष

पुण्याच्या गणेशोत्सवातील मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. पर्यावरणपूरक हरित रथातून मिरवणुकीची सुरुवात होणार असून, त्यानंतर चांदीच्या रथातून बाप्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईल.

गणरायाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गांवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन सोहळ्याचीही तयारी पूर्ण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठीही मंडळाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. उत्सव मंडपातून गणपतीला मंदिरात नेऊन विराजमान करण्याची प्रक्रिया नियोजित वेळेनुसार पार पडणार आहे. त्यानंतर दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. या मिरवणुकीला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

चार प्रमुख मार्गांवरून ६३८ मंडळांच्या मिरवणुका

विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी शहरात रूट मार्च काढून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून एकूण ६३८ गणेश मंडळे विसर्जन मिरवणुका काढणार आहेत.

यापैकी १५० गणेश मंडळांना कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाविक आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईतही विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

दरम्यान, मुंबईतही अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीसह शहरातील विविध विसर्जन स्थळांवर महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईत ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव आणि ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत.

नागरिकांना त्यांच्या जवळचे विसर्जन स्थळ सहज शोधता यावे, यासाठी गुगल मॅप्स आणि क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, विसर्जन सोहळ्यादरम्यान आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांत गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असून, भक्ती, उत्साह आणि पारंपरिक जल्लोषात विसर्जन सोहळा पार पडणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती