पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता करणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला आज सकाळपासून जल्लोषात सुरुवात झाली. मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुका बेलबाग चौकातून एकापाठोपाठ मार्गस्थ झाल्या. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वाद्यांचा निनाद, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने पुण्याच्या मध्यवर्ती भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणरायाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांसह बाहेरून आलेल्या भाविकांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. विविध ढोल-ताशा पथकांचे दमदार वादन, आकर्षक रथ, पारंपरिक वेशभूषा आणि विविध सामाजिक संदेश देणारे देखावे यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली आहे.
मानाचा पहिला – श्री कसबा गणपती
मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रमणबाग, परशुराम आणि रुद्रगर्जना या ढोल-ताशा पथकांच्या वादनात कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ झाली.
यंदाच्या मिरवणुकीतील पर्यावरणपूरक ‘हरित रथ’ हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. या रथाच्या माध्यमातून ‘नशामुक्त भारत’ अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सामाजिक संदेश आणि पारंपरिक उत्सव यांचा सुंदर मेळ या मिरवणुकीत पाहायला मिळत आहे.
मानाचा दुसरा – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीही उत्साहपूर्ण वातावरणात बेलबाग चौकातून मार्गस्थ झाला. शिवमुद्रा, विघ्नहर्ता आणि ताल या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने परिसर दुमदुमून गेला. त्याचबरोबर ‘विष्णूनाद’ पथकाच्या शंखनादाने मिरवणुकीत भक्तिमय वातावरण निर्माण केले.‘तुळजाभवानी प्रबोधन रथ’ हे यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत असून, रथ पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
मानाचा तिसरा – श्री गुरुजी तालीम मंडळ
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूकही ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात पुढे सरकत आहे. नादब्रह्म, गर्जना आणि शिवगर्जना या ढोल-ताशा पथकांच्या दमदार वादनाने वातावरण भारावून गेले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करण्यात येत असून, भाविकांकडून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला जात आहे.विविधरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवलेला ‘माता महाकाली रथ’ हा मिरवणुकीचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरला आहे. रथ पाहण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत आहे.
मानाचा चौथा – श्री तुळशीबाग गणपती
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची भव्य मिरवणूकही बेलबाग चौकातून मार्गस्थ झाली आहे. तुळशीबाग गणपतीची देखणी मूर्ती आणि भव्य ‘विष्णू रथ’ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.हायड्रॉलिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेला हा रथ मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत आहे. रथापुढे सुरू असलेल्या शंखनादामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
मानाचा पाचवा – श्री केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीलाही उत्साहात सुरुवात झाली. मिरवणुकीपूर्वी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यंदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त साकारण्यात आलेला जिवंत देखावा हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत आहे.
पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग
मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुका बेलबाग चौकातून मार्गस्थ होत असताना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा निनाद, शंखनाद, फुलांची सजावट, आकर्षक रथ आणि विविध सामाजिक संदेश देणारे देखावे यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने भारावून गेला आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळत आहे. बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभाव आणि मनात पुढील वर्षी लवकर येण्याची आस दिसून येत आहे.