वर्धा : वर्ध्यात १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही ऑटोचालक आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी चंद्रपूर येथे नातेवाईकांकडे गेली होती. तेथून परतताना ती सेवाग्राममार्गे वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र, वर्ध्यात पोहोचेपर्यंत रात्री उशीर झाला होता. याच दरम्यान एका ऑटोचालकाने तिला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने स्थानकाबाहेर नेल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानकाबाहेर नेल्यानंतर ऑटोचालकासह आणखी एका व्यक्तीने तरुणीवर अत्याचार केला. या घटनेनंतर तरुणी पुन्हा रेल्वे स्थानकावर परतली. मात्र, काही वेळाने काही जण पुन्हा तिच्याजवळ आले आणि तिला जबरदस्तीने सोबत घेऊन गेल्याचा आरोप आहे. यावेळी आधीच्या घटनेतील आरोपीही त्यांच्यासोबत असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
पीडितेच्या तक्रारीनुसार, दुसऱ्यांदा तिला घेऊन गेल्यानंतर आणखी काही जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आणि तिने केलेल्या ओळखीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये ऑटोचालकांसह त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे. प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत असून, घटनेशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जात आहे.