सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 राज्य

“अरे जल्दी कर, सकाळी पनवेलला जायचंय...” म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याला स्टेजवर बोलावून कॉलर पकडल्याचा आरोप

डिजिटल पुणे    25-09-2026 13:55:51

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील निरमा विद्यापीठातील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राध्यापक-विद्यार्थी वाद चर्चेत आला आहे. विद्यापीठाच्या तांत्रिक आणि सांस्कृतिक महोत्सवादरम्यान एका विद्यार्थ्याने मजेशीर अंदाजात केलेल्या टिप्पणीवरून प्राध्यापक संतापल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला मंचावर बोलावून त्याची कॉलर पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निरमा विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विभागाकडून १८ ते २० सप्टेंबरदरम्यान ‘टेक्नोफ्रा २०२६’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ८०० हून अधिक विद्यार्थी व सहभागी उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्राध्यापकाचे मंचावरील भाषण सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याने ‘गोलमाल ३’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाची नक्कल करत, “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है,” अशी टिप्पणी केली. विद्यार्थ्याची ही टिप्पणी प्राध्यापकांना खटकली.

यानंतर संबंधित प्राध्यापकांनी विद्यार्थ्याला मंचावर बोलावल्याचे आणि सर्वांसमोर त्याची कॉलर पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. शिक्षकांचा अपमान केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी विद्यार्थ्याला दिल्याचे सांगितले जाते.या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. काही जणांनी विद्यार्थ्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला, तर काहींनी विद्यार्थ्याशी मंचावर करण्यात आलेल्या कथित वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, गुजरात NSUI ने या घटनेची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. विद्यार्थ्याशी कथित गैरवर्तन करणाऱ्या प्राध्यापकांनी माफी मागावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही NSUI कडून देण्यात आला आहे.या प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृतपणे काय भूमिका घेतली जाते, तसेच संबंधित प्राध्यापक आणि विद्यार्थ्याचे म्हणणे काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती