सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत तुळजाभवानीचा जिवंत देखावा; साजिरं रूप पाहून भाविक भारावले

डिजिटल पुणे    25-09-2026 15:00:42

पुणे : गणरायाला निरोप देण्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका भक्तिमय वातावरणात मार्गस्थ होत आहेत. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरातील वातावरण दुमदुमून गेले आहे. याच पार्श्वभूमीवर तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा तुळजाभवानीचा साकारण्यात आलेला जिवंत देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला.

तुळजाभवानीचे साजिरे रूप रथातून मिरवणुकीत सहभागी झाले. गणपतीच्या पालखीसोबत निघालेला हा रथ पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवीचे दर्शन होताच अनेक भाविकांनी हात जोडून नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. श्रद्धा आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणामुळे मिरवणुकीला वेगळेच धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.

वारकरी परंपरेचीही खास झलक

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीत केवळ देवीचा देखावाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचेही दर्शन घडले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ आणि मुखी विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या नामघोषाने परिसर भक्तिमय झाला.

वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेने आणि टाळ-मृदंगाच्या नादाने मिरवणुकीत आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. गणेशभक्ती आणि विठ्ठलभक्तीचा हा संगम पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा उत्साह

मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचा जोशपूर्ण गजर सुरू होता. पारंपरिक वाद्यांचा निनाद, टाळांचा आवाज आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला होता. मिरवणूक पुढे सरकत असताना भाविकांकडून गणरायाच्या जयघोषासोबतच देवीच्या दर्शनासाठीही मोठा उत्साह पाहायला मिळाला.

तुळजाभवानीचा रथ आणि वारकऱ्यांचा सहभाग यामुळे तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा अधिक लक्षवेधी ठरली. धार्मिक श्रद्धेसोबत महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन या सोहळ्यातून घडले.

भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा संगम

पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडते. तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या यंदाच्या मिरवणुकीतही ही परंपरा कायम राहिली.

तुळजाभवानीचा रथ, वारकऱ्यांचा नामघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि गणरायाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात मिरवणूक पुढे सरकत होती. त्यामुळे विसर्जन सोहळा हा केवळ गणरायाला निरोप देण्याचा क्षण न राहता पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा सोहळा ठरला.तुळजाभवानीचे साजिरे रूप पाहण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी आणि वारकरी परंपरेचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले.


 Give Feedback



 जाहिराती