सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

गणेश चतुर्थीला फुटबॉल खेळायला गेला अन् बेपत्ताझाले; थेट १२ दिवसांनी विसर्जनाच्या दिवशी अंकितचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

डिजिटल पुणे    25-09-2026 15:19:46

वसई : गणेश चतुर्थीच्या दिवशी मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी सुरुची बीचवर गेलेल्या १५ वर्षीय अंकित गुप्ताचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी मृतदेह आढळून आला. गुजरात सीमेजवळील मोर्डी येथील समुद्रकिनारी त्याचा मृतदेह सापडला. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी बेपत्ता झालेल्या अंकितचा मृतदेह गणेश विसर्जनाच्या दिवशी मिळाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नायगावच्या रश्मी परिसरात राहणारा अंकित १४ सप्टेंबर रोजी सकाळी मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी सुरुची बीचवर गेला होता. खेळ सुरू असताना फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेल्याने तो आणण्यासाठी अंकित समुद्रात उतरला. मात्र, समुद्रातील जोरदार प्रवाहामुळे तो वाहून गेला आणि त्यानंतर त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस, अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पथकांनी शोधमोहीम सुरू केली. समुद्रकिनाऱ्यासह समुद्रातील विविध भागांत बोटींच्या सहाय्याने शोध घेण्यात आला. त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही हवाई शोधमोहीम राबवण्यात आली. सलग १२ दिवस विविध स्तरांवर शोध घेऊनही अंकितचा शोध लागत नव्हता.

सकाळी घरातून निघाला आणि पुन्हा घरी परतलाच नाही

अंकित नायगाव ईस्ट येथील रश्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत होता. त्याचे काका धर्मेंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ५.५० वाजता अंकित डॉन बॉस्को येथे फुटबॉल खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मित्रांनी ओला कॅब बुक करून सुरुची बीच गाठल्याचे सांगितले.

मित्रांच्या माहितीनुसार, फुटबॉल समुद्रात गेल्यानंतर अंकित आणि त्याचे दोन साथीदार तो आणण्यासाठी पाण्यात गेले. अंकित पुढे गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो समुद्राच्या प्रवाहात वाहून गेला. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

१२ दिवसांच्या शोधमोहीमेनंतर मोर्डी येथे मृतदेह

अंकित बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. समुद्रातील संभाव्य ठिकाणांसह किनारपट्टीवरही तपास करण्यात आला. अखेर १२ दिवसांनी गुजरात सीमेजवळील मोर्डी येथे समुद्रकिनारी अंकितचा मृतदेह आढळून आला.

गणेश चतुर्थीला मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडलेला अंकित पुन्हा परतलाच नाही. ज्या दिवशी त्याचे कुटुंबीय बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत होते, त्याच दिवशी अंकितचा मृतदेह सापडल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती