सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

गव्हाणफाटा ते दिघोडे रस्त्यावर एका बाजूची ५ मीटरची लेन लहान वाहनांसाठी राखीव ठेवण्याची स्थानिक नागरिकांची मागणी.;अवजड वाहतुकीमुळे होणारी कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी नागरिकांचे निवेदन.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    25-09-2026 16:21:36

उरण :  पनवेल तालुक्यातील गव्हाणफाटा ते उरण तालुक्यातील दिघोडे दरम्यानच्या चारपदरी काँक्रीट रस्त्यावर वाढलेल्या अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता, रस्त्याच्या एका बाजूची सुमारे ५ मीटर रुंदीची लेन लहान वाहनांसाठी राखीव ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रेलर आणि इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहने पार्क केली जात असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, रुग्णवाहिका तसेच इतर आपत्कालीन वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर चारपदरी रस्त्याच्या एका बाजूची सुमारे ५ मीटरची लेन सिमेंट डिव्हायडरच्या माध्यमातून केवळ लहान वाहनांसाठी राखीव करण्यात यावी. या लेनमध्ये ट्रेलर अथवा इतर अवजड वाहनांना प्रवेश तसेच पार्किंग करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मातीचा भराव करून ही लेन वाहतुकीसाठी व्यवस्थित वापरण्यायोग्य करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.- 

वहाळ पुलावरील व्यवस्थेच्या धर्तीवर उपाययोजना:- 

पनवेल तालुक्यातील वहाळ पुलावर यापूर्वी अशा प्रकारची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर गव्हाणफाटा-दिघोडे मार्गावरही लहान वाहनांसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर येथील ऐतिहासिक जंगल सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने रायगडचे पालकमंत्री भरतशेट गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर तसेच स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले.दरम्यान, या उपाययोजनेसाठी शासनाकडे आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्यास, नागरिकांचा वेळ, आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन स्थानिक नागरिक आपल्या परीने आर्थिक योगदान तसेच श्रमदान करण्यास तयार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गव्हाणफाटा-दिघोडे मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या मागणीचा तातडीने विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती