बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिली मोठी निवडणूक असल्याने पवार कुटुंबातील दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू होती. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीही उमेदवारांच्या गाठीभेटी आणि निवडणुकीची तयारी सुरू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.
२१ जागांसाठी तब्बल ५१४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे या मुदतीपूर्वी पवारांच्या मध्यस्थीतून दोन्ही बाजूंमध्ये समझोता होतो का आणि सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध होते का, याकडे बारामतीसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कारखान्याच्या वार्षिक अहवालात पार्थ पवार यांचा फोटो नसल्याने काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी यावर टीका केली होती. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता पवार कुटुंबातील चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.