सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 विश्लेषण

लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात खोल समुद्रात विसर्जन

डिजिटल पुणे    26-09-2026 11:24:49

मुंबई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाला अखेर भावपूर्ण निरोप देण्यात आला. तब्बल २२ तासांहून अधिक काळ सुरू असलेली विसर्जन मिरवणूक आज सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. त्यानंतर पारंपरिक आरती आणि विधी पूर्ण करून लालबागच्या राजाचे अत्याधुनिक बार्जच्या माध्यमातून खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजता लालबागच्या मंडपातून बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. मंडपातून बाहेर पडताच भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने राजाचे स्वागत केले. लालबागपासून गिरगाव चौपाटीपर्यंतच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या जयघोषात मिरवणूक पुढे सरकत राहिली.

मिरवणुकीला तब्बल २२ तासांहून अधिक काळ लागल्यानंतर लालबागचा राजा सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला. बाप्पाच्या आगमनापूर्वीच चौपाटीवर मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. लाडक्या राजाच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

चौपाटीवर पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाची विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली. आरतीनंतर परंपरेनुसार मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने काढण्यात आले. त्यानंतर विसर्जनासाठी बाप्पाची मूर्ती अत्याधुनिक बार्जवर सुरक्षितपणे विराजमान करण्यात आली.

कफ परेड आणि कुलाबा परिसरातील कोळी बांधवांनी आपल्या बोटींच्या ताफ्याच्या मदतीने बार्जला खोल समुद्राच्या दिशेने नेले. समुद्रातील योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर विधीवत पद्धतीने लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, बाप्पाच्या विसर्जनाचा अंतिम क्षण पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजारो भाविक उपस्थित होते. राजाच्या विसर्जनावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सुरू होता. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेक भाविक भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

नवसाला पावणारा राजा अशी श्रद्धा असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाने यंदाच्या गणेशोत्सवातील या भव्य सोहळ्याची सांगता झाली. जड अंतःकरणाने भाविकांनी बाप्पाला निरोप दिला आणि पुढील वर्षी राजाच्या लवकर आगमनाची प्रार्थना केली.

 


 Give Feedback



 जाहिराती