वृंदावन (उत्तर प्रदेश) : मथुरेतील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रम परिसरात त्यांच्या एका शिष्याच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. दीपक कुमार उर्फ ‘रसिक दुलारी सरन’ यांचा सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आश्रम परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर दीपक कुमार यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वृंदावन कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
दीड वर्षांपासून आश्रम परिसरातील सोसायटीत वास्तव्यास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कुमार हे प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामागील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये गेल्या दीड वर्षांपासून राहत होते. ते मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतल्याची माहिती समोर आली आहे.शुक्रवारी ते सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याचे समोर आले. हा प्रकार आत्महत्येचा आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
शरीरावर दुखापतींच्या खुणा; खोलीत संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृताच्या शरीरावर काही गंभीर दुखापतींच्या खुणा आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या खोलीत एक ग्राइंडरही आढळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वस्तूचा घटनेशी नेमका संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणातील संवेदनशील बाबींची पोलिसांकडून सखोल पडताळणी केली जात आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल तसेच घटनास्थळावरील पुरावे तपासल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत
दीपक कुमार यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून आश्रम परिसरातील व्यक्ती तसेच संभाव्य प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे.प्राथमिक माहितीच्या आधारे आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पोलिसांकडून अन्य शक्यतांचाही तपास केला जात आहे. त्यामुळे अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगता येणार नाही.
आश्रम परिसरात शांतता
या घटनेनंतर प्रेमानंद महाराजांच्या आश्रम परिसरात शांतता पसरली आहे. घटनेबाबत आश्रमाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.