पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेले विजय कोळी हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, सरकारी पिस्तुलातून गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कोळी हे बुधवारी (२३ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. घरातून जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
कोळी यांचे शेवटचे लोकेशन निगडी येथील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. त्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळला.
घटनास्थळी सरकारी पिस्तूलही पोलिसांना मिळून आले. प्राथमिक तपासात त्याच पिस्तुलातून गोळी झाडून त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.विजय कोळी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे RTPC म्हणून नियुक्तीला होते. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून, चिखली पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.