महाराष्ट्र : राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता वाढत्या तापमानाने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. सप्टेंबर महिन्याचा शेवट जवळ येत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. काही भागांत तर तापमानाने 35 अंशांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्येच नागरिकांना ऑक्टोबर हिटचा अनुभव येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या अखेरीस राज्यातील काही भागांत उष्णतेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तसेच किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासाठी उकाड्याचे ठरण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये पावसाची मोठी तूट
नाशिक जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. या महिन्यात पावसाची तब्बल 70 टक्के तूट नोंदवली गेली आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवसांत कमाल तापमानात सुमारे सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 वर्षांतील उच्च तापमानाची नोंद
छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाने 35.8 अंश सेल्सिअसची नोंद केली. सप्टेंबर महिन्यातील गेल्या 25 वर्षांच्या कालावधीच्या तुलनेत हे अत्यंत उच्च तापमान असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील तापमान सातत्याने 30 अंशांच्या पुढे राहिल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
चार जिल्ह्यांत तापमान 35 अंशांच्या पुढे
रविवारी राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. सोलापूर आणि अमरावतीमध्ये 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोल्यात 35.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीसच राज्यात उन्हाचा पारा चढताना दिसत आहे.
भामरागडमध्ये पूरस्थिती कायम
एकीकडे राज्यातील काही भाग उष्णतेने हैराण असताना गडचिरोलीच्या भामरागडमध्ये मात्र पूरस्थिती कायम आहे. सलग चौथ्या दिवशीही परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. भामरागड गावात शिरलेले पाणी ओसरले असले तरी पर्लकोटा नदीच्या पुलावर अद्याप सुमारे चार फूट पाणी आहे.त्यामुळे आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक बंद आहे. पुराचे पाणी पूर्णपणे ओसरण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागली असून, चाळीसहून अधिक गावांचा संपर्क अद्याप बाधित असल्याचे चित्र आहे.
भंडाऱ्यात जलसाठ्याची चिंता वाढली
पावसाळा अंतिम टप्प्यात असतानाही भंडारा जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक नसल्याने आगामी काळात पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील महत्त्वाचा गोसेखुर्द प्रकल्प सध्या सुमारे 76 टक्के भरला आहे. तर बावनथडी प्रकल्पात केवळ 36.70 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांमध्ये 59.70 टक्के, तर 31 लघू प्रकल्पांमध्ये 68.89 टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. याशिवाय 28 मालगुजारी तलावांमध्ये सुमारे 79.30 टक्के पाणीसाठा आहे.खरीप हंगामाच्या अखेरीसच जलसाठ्याची ही परिस्थिती असल्याने आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात एका बाजूला पावसाची प्रतीक्षा, तर दुसऱ्या बाजूला वाढता उकाडा आणि काही भागांत पूरस्थिती, असे परस्परविरोधी हवामानाचे चित्र पाहायला मिळत आहे.