पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड व राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय भारत सरकार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या 'नशा मुक्त युवक फॉर विकसित भारत' या अभियानांतर्गत 'माझे आरोग्य, माझा अभिमान' या संकल्पनेखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी 'व्यसनाधीनता व व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम' तसेच 'पोषण आहाराचे महत्त्व' या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे होते, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत आशिष शेटे, नितीन दळवी होते.
यावेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी यांनी 'व्यसनाधीनता व व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम' या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्यसनाची सुरुवात कशी होते, त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम, व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिक समस्या तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक सजगता याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. युवकांनी व्यसनांना नकार देऊन आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सोनाली तळवलीकर यांनी 'पोषण आहाराचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील संतुलित आहार, पौष्टिक अन्नपदार्थ, योग्य आहाराच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शरीराच्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही योग्य पोषण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे गोरन ग्रॉसकोफ फँमिली क्लिनिक कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, डॉ.अशोक शेळके, प्रा.रचना कोळपे,प्रा.निकिता कदमबांडे, प्रा.प्रशांत एखंडे, प्रा.अभिजित शिंदे, प्रा.कीर्ती करंजावणे, आशिष परमार यांनी केले.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषण आहार याबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. 'निरोगी युवक - व्यसनमुक्त समाज - विकसित भारत' या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.