सिल्लोड : छत्रपती संभाजीनगरहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. अजिंठा येथील मुखपाठ फाट्याजवळ बसने पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तब्बल 29 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणारी एसटी बस (एमएच 06 बीडब्ल्यू 1236) मुखपाठ फाट्याजवळ आली असताना हा अपघात झाला. याचवेळी पोकलेन घेऊन जाणारा अवजड ट्रेलर (एनएल 01 एल 7615) पुढे जात होता. बसने ट्रेलरला मागून धडक दिल्याने बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
धडक इतकी भीषण होती की, पोकलेनचा काही भाग बसची काच फोडून आत घुसला. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांच्या डोक्याला, हाताला, पायाला तसेच नाकाला दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूकही सुरळीत करण्यात आली.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीरंग फलके, डॉ. अमोल गिरी, डॉ. महेश राठोड यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले.
या अपघातामुळे मुखपाठ फाट्याजवळ काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अचानक घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.