सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

रंगातून स्वच्छ पुणे, स्वच्छतेतून निरोगी पुणे! - रायसोनीतर्फे २ ऑक्टोबरला चित्रकला स्पर्धा ;पुणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    29-09-2026 16:07:36

पुणे : पुणे शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणेच्या 'सामवेद' स्कूल ऑफ आर्ट, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन, एंटरटेनमेंट अँड डिझाइन आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगातून स्वच्छ पुणे- स्वच्छतेतून निरोगी पुणे!’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर येथे ही स्पर्धा होणार आहे.

महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छतेचा संदेश यांची सांगड घालत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून कलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश आणि चित्रातून पर्यावरण संवर्धनाचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पुणे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी विद्यार्थी, कलावंत, कला-प्रेमी तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

‘स्वच्छ पुणे- सुंदर पुणे! माझे पुणे- माझी जबाबदारी!’ हा संदेश कलेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेसाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रा. देवेंद्र पोटदुखे (९७६६९ ३७९५६) आणि प्रा. मधुकर चंदनशिवे (९९६०७ ३९४६७) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. उपक्रमाचे आयोजन सामवेदचे अधिष्ठाता डॉ. ए. डी. काटे आणि कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.                                             

तीन वयोगटांत स्पर्धा

चित्रकला स्पर्धेसाठी तीन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. ५ ते १२ वर्षे, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील असे हे तीन गट आहेत. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना चषक प्रदान करण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक सहभागी कलाकारांना (ए-३) आकाराचा कागद आयोजकांकडून देण्यात येईल. चित्रकलेसाठी आवश्यक असलेले इतर साहित्य सहभागी कलाकारांनी स्वतः आणावे, अशी सूचना आयोजकांनी केली आहे.

सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत स्पर्धा

चित्रकला स्पर्धेची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य आहे. मात्र, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे.

कलावंतांसह विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

शहराच्या स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ प्रशासन किंवा एखाद्या संस्थेपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक नागरिकाच्या कृतीतून प्रत्यक्षात यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, कलावंत, कला-प्रेमी आणि पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या चित्रातून स्वच्छ व निरोगी पुण्याचा संदेश द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती