पुणे : नऱ्हे, वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे आणि बजावलेल्या कर्तव्याचे कौतुक करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच भाविक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावले.

उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गणेशोत्सवाचा संपूर्ण कालावधी सुरळीतपणे पार पडण्यास मदत झाली.
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना गणेशोत्सवाचा आनंद घेता आला. पोलिसांनी दिलेल्या या उल्लेखनीय सेवाभावी योगदानाबद्दल त्यांचे आभार मानणे ही समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
याप्रसंगी नऱ्हे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक राहुल गौड तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे नगरसेविका कोमल नवले यांनी विशेष आभार व्यक्त केले.
