ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांची हत्या झाल्याने राजकीय आणि पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्याच्या तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे CCTV फुटेज लागले आहे. जवळच्या मेडिकल दुकानातील सीसीटीव्हीत गोळीबाराचे आवाज कैद झाल्याची माहिती असून, पूर्णेकर यांच्यावर सात गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर जखमी पूर्णेकर यांना रुग्णालयात घेऊन जातानाचे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
हल्ल्यापूर्वी आरोपींची रेकी?
पोलिसांना मिळालेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहऱ्यावर रुमाल बांधलेले दोन जण दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हल्ल्यापूर्वी आरोपींनी परिसराची रेकी केली होती का, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा पाच संशयितांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचसह पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत.
कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी या हत्येमागे राजकीय वैमनस्य असल्याचा आरोप केला आहे. त्यांचा मुलगा राम पूर्णेकर याने मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्याकडून वडिलांना धमकी देण्यात आल्याचा दावा केला आहे. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हे सर्व घडवून आणल्याचा आरोपही त्याने केला आहे.
पूर्णेकर यांचे मोठे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनीही हल्लेखोरांकडून गणपतीपासूनच रेकी सुरू असल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
हल्ल्यामागचं नेमकं कारण काय?
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हल्ल्याचे सूत्रधार कोण आहेत आणि या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे हल्ल्याचा संपूर्ण उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.दरम्यान, या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता असून, पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.