सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 DIGITAL PUNE NEWS

ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांची हत्या; हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे संतप्त, म्हणाले, “कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या”

डिजिटल पुणे    30-09-2026 15:39:28

ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (29 सप्टेंबर) रात्री त्यांच्या कार्यालयाजवळ हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांच्यावर धारदार शस्त्रानेही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत चीड आणणारी आणि घृणास्पद घटना असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

“सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललं आहे. पोलीस आपलं काम करण्याचा प्रयत्न करतील; मात्र राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल, तर पोलीस विभाग तरी काय करणार?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

हत्येतील आरोपी तसेच या प्रकरणामागील शक्तींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदीप पूर्णेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा-मनोरमानगर परिसरातील कार्यालयाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही वार केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी या हत्येमागे कट असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी काही राजकीय व्यक्तींवरही गंभीर आरोप केले असून, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख याबाबत तपास सुरू आहे.हत्येच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती