पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भारत सरकारच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (एमईएस) यांच्या सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.हा प्रकल्प फ्लो एपीआयएस प्रा लि आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालयचा माहिती -तंत्रज्ञान विभागातील सहकार्य करारानुसार सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून स्थापन करण्यात आलेल्या फ्लो एआय इनोव्हेशन अँड रिसर्च लॅबोरेटरीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात आला
या प्रकल्पात २ मेगावॅट क्षमतेच्या ऑफ-ग्रिड सोलर मायक्रोग्रिडचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये हायब्रिड हायड्रोजन फ्युएल सेल आणि लिथियम-आयन ऊर्जा साठवण प्रणालीचे एकत्रीकरण तसेच एआय आधारित ऊर्जा व्यवस्थापन आणि सिम्युलेशनचा अभ्यास करण्यात आला. संरक्षण आस्थापनांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता, शाश्वतता आणि विश्वासार्हता वाढविण्याच्या दृष्टीने या प्रकल्पावर काम करण्यात आले.
या प्रकल्पाच्या आढावा कार्यक्रमाला पुणे येथील चीफ इंजिनिअर व जॉइंट डायरेक्टर जनरल (पर्सोनेल अँड ट्रेनिंग) तसेच असिस्टंट डायरेक्टर जनरल (डिझाइन अँड कन्सल्टन्सी) उमेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत आयडीएसई अधिकारी ब्रजेन्द्र कुमार, डायरेक्टर (डिझाइन) आणि मितेश बरकले, डायरेक्टर (डिझाइन) उपस्थित होते.
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. सोनाली माळी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करणारे डॉ. मिलिंद गायकवाड यांचीही यावेळी उपस्थिती होती. बीटेक आयटी विद्यार्थी ऋषिकेश गिरपुंजे यांनी संशोधनाशी संबंधित तुलनात्मक अभ्यास आणि प्रकल्पाच्या भविष्यातील संधींचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे समन्वय सोमेश सिंग यांनी केले, तर डॉ. गजानन व्ही. भोळे यांनी आभार मानले. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्स विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रकल्पात सहभाग घेतला.
उमेश कुमार यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात चिकित्सक आणि तार्किक विचार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोणतेही तांत्रिक समाधान विकसित करण्यापूर्वी समस्या सखोलपणे समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी बहुविध ज्ञान आत्मसात करून भविष्यात एमईएसच्या विविध प्रकल्पांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. राजेश प्रसाद यांनी फेअर लॅबच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील क्षमता प्रत्यक्ष सरकारी आणि औद्योगिक समस्यांशी जोडण्याचे काम होत असल्याचे सांगितले. डॉ. सोनाली माळी यांनी एआय आणि बहुविषयक सहकार्याच्या माध्यमातून जटिल अभियांत्रिकी समस्यांवर काम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.