ठाणे : ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री कार्यालयातच पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणात त्यांचा जुना मित्र पप्या शिंदे याचे नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हत्येपूर्वी पप्या शिंदे हा पूर्णेकर यांच्या कार्यालयात उपस्थित होता. कार्यालयात कोणी नसल्याची माहिती त्याने मारेकऱ्यांना दिल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यानंतर आरोपींनी कार्यालयात प्रवेश करून पूर्णेकर यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यानंतर पप्या शिंदेनेच पूर्णेकर यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्याच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला. हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले असताना पप्या शिंदे याला कोणतीही दुखापत कशी झाली नाही, असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासात तो हत्येच्या कटात सहभागी असल्याचे समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
‘तू त्याचा मित्र होतास ना?’ पत्नीचा आक्रोश
प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर बुधवारी ठाण्यातील घरी आणण्यात आला. अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पूर्णेकर यांच्या पत्नीने धाय मोकलून रडत पप्या शिंदे याला उद्देशून सवाल केला.
“पप्या शिंदे, तू माझ्या नवऱ्याला का मारलंस? तू त्याचा मित्र होतास ना? एका ताटात जेवलास. तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवीन कपडे घेतले होते. मग कोणाच्या सांगण्यावरून हे केलंस? माझ्या नवऱ्यावर इतके वार का केले? इतक्या गोळ्या का झाडल्या?” असा सवाल करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रदीप पूर्णेकर हे अमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवत होते. परिसरातील तरुण नशेच्या आहारी जाऊ नयेत, यासाठी ते काम करत होते, असा उल्लेखही त्यांच्या पत्नीने केला. “मी त्याला लढू नकोस, असे सांगत होते; पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. लेकरांना मागे टाकून तो निघून गेला,” असे म्हणत त्यांनी टाहो फोडला.
काही महिन्यांपासून अबोला, अचानक पुन्हा मैत्री
पोलिसांच्या तपासात पूर्णेकर आणि पप्या शिंदे यांच्या संबंधांबाबतही माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर जवळपास सहा ते सात महिने दोघांमध्ये बोलणे बंद होते. मात्र, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पप्या शिंदे पुन्हा पूर्णेकर यांच्या संपर्कात आला होता. तो वारंवार पूर्णेकर यांच्यासोबत दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
पप्या शिंदे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2004 पासून त्याच्यावर आठ ते नऊ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती.
पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी पप्या शिंदेसोबतच्या संबंधांबाबत आपल्या भावाला सावध केले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, पूर्णेकर यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता याच मैत्रीचा वापर हत्येच्या कटासाठी झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पप्या शिंदे मुख्य आरोपी; 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पप्या शिंदे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांनी मीरा रोड परिसरातून एका महिला आणि एका पुरुषालाही ताब्यात घेतले आहे. हे दोघे फरार आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोघांकडून फरार आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतरही पप्या शिंदे त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हत्येपूर्वी तो पूर्णेकर यांच्या कार्यालयात बसला होता, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे हत्येचा कट नेमका कधी आणि कुठे रचण्यात आला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
सध्या या प्रकरणातील चार आरोपी फरार असून, ठाणे शहर गुन्हे शाखेकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पप्या शिंदेचे फरार साथीदार कोण आहेत, त्यांना कोणी मदत केली आणि हत्येमागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.