सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

नवले पूल ते भूमकर चौक प्रश्नांवर नगरसेवक हरिदास चरवड आक्रमक; १५ दिवसांत कार्यवाहीचा अल्टिमेट; वाहतूक कोंडी, अंडरपास, सर्व्हिस रोड, अतिक्रमण व पार्किंग प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी

गजानन मेनकुदळे    01-10-2026 17:18:07

पुणे : नवले पूल ते भूमकर चौक तसेच नऱ्हे, आशीर्वाद हॉटेल, विश्वास हॉटेल, वीर बाजी पासलकर चौक आणि वडगाव बुद्रुक परिसरातील वाहतूक व नागरी सुविधांच्या प्रश्नांवर नगरसेवक हरिदास चरवड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे महानगरपालिका, NHAI आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करून नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

नऱ्हे स्मशानभूमीसाठी रॅम्प, गेट, संरक्षक जाळी आणि पडलेली संरक्षक भिंत तातडीने उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्मशानभूमीजवळील सर्व्हिस रोड महामार्गाला जोडून पुढे समांतर सर्व्हिस रोडद्वारे भूमकर चौकाकडे जोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक ठिकाणी रिटेनिंग वॉल व एक्झिटची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.

भूमकर चौक अंडरपासला गती

भूमकर चौकातील अंडरपासच्या कामाला गती मिळाली असून, येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती पाहणीदरम्यान देण्यात आली. सुमारे १५ मीटर रुंदी व आवश्यक उंचीसह अंडरपासच्या तांत्रिक बाबींची पाहणी करण्यात आली. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन अतिरिक्त पर्यायी अंडरपास किंवा लेनची शक्यताही तपासण्याची मागणी चरवड यांनी केली.

नवले पूल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

नवले पूल परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्त्याची आवश्यक रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात आली. आशीर्वाद हॉटेल परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे अनावश्यक पावसाळी गटार हटवून रस्त्याची रुंदी वाढविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असून, १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले.

विश्वास हॉटेल चौकातील कोंडीवर आराखडा

विश्वास हॉटेल चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुढील गुरुवारपर्यंत वाहतूक नियोजनाचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष पाहणी व निर्णय घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

वीर बाजी पासलकर चौकात लेन रुंदीकरणाची मागणी

हायवे पुलाखालील लेन रुंद करून जड वाहनांना विनाअडथळा वळता यावे, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे आवश्यक परवानग्या घेऊन हटविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

वडगाव बुद्रुक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. तसेच रस्त्यावर होणारे बेकायदेशीर पार्किंग आणि लक्झरी व प्रवासी वाहने थांबत असल्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

१५ दिवसांत कार्यवाही, अन्यथा उपोषण

वरील प्रश्नांवर १५ दिवसांत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नाही, तर नवले पूल परिसरात किंवा वीर बाजी पासलकर चौकात उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक हरिदास चरवड यांनी अधिकाऱ्यांना दिला.“प्रश्न प्रलंबित ठेवायचे नाहीत; प्रत्यक्ष पाहणी, ठोस नियोजन आणि वेळेत कार्यवाही झाली पाहिजे. नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार,” असे हरिदास चरवड यांनी स्पष्ट केले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती