मुंबई : दुबईहून तेल अवीवकडे रवाना झालेल्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात बुधवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछार यांच्यावर सहवैमानिकाने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही कॅप्टन स्मित यांनी प्रसंगावधान सोडले नाही. उलट, स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
घटनेनंतर कॅप्टन स्मित यांचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापती झाल्याचे दिसते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत असूनही ते पूर्णपणे शुद्धीत होते. विमानातील प्रवाशांनी हल्लेखोर सहवैमानिकाला पकडून त्याचे हात बांधल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते.
हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित यांना मोठ्या वेदना होत होत्या. एका व्हिडिओमध्ये ते डोके आणि हातामध्ये तीव्र वेदना होत असल्याचे सांगताना ऐकू येतात. ''मला उशी द्या, पण मला झोपायचे नाही,'' असे ते म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीत विमानाच्या लँडिंगसाठी मदत करता यावी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवता यावे, यासाठी शुद्धीत राहणे आवश्यक असल्याचे त्यांना माहीत होते.
दरम्यान, विमानातील काही प्रवाशांनी धाडस दाखवत हल्लेखोर सहवैमानिकाला आवरले. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा उद्देश पायलटवर हल्ला करून विमानावर नियंत्रण मिळवण्याचा होता. मात्र, प्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानातून तातडीचा आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबुक विमानतळाकडे वळवण्यात आला. विमानात प्रवासी म्हणून असलेल्या काही ऑफ-ड्युटी वैमानिकांनीही या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर विमानाचे तबुक येथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
विमान उतरल्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी हल्लेखोर सहवैमानिकाला ताब्यात घेतले. त्याचवेळी कॅप्टन स्मित यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. व्हिडिओमध्ये ते रक्तबंबाळ अवस्थेत असले तरी संयम राखून उपचारांची प्रतीक्षा करताना दिसतात. त्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून तबुक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात नेत असताना कॅप्टन स्मित यांनी सहवैमानिकाने आपल्यावर अनेक वार केल्याचे सांगितले. आपण चालू शकत असलो तरी हाताची मूठ आवळता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गंभीर दुखापत होऊनही त्यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर कॅप्टन स्मित मछार यांच्या धैर्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कौतुक केले आहे. तसेच हल्लेखोराला रोखून प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या चार नागरिकांचा सन्मान करण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप तपासात आहे. सहवैमानिकाचा विमानाचा ताबा घेण्याचा किंवा मोठी दुर्घटना घडवण्याचा हेतू होता का, याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत. मात्र, ऐन हवेत जीवघेणा हल्ला झाल्यानंतरही कॅप्टन स्मित यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रवाशांनी केलेला प्रतिकार यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे या घटनेतून समोर आले आहे.