सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 विश्लेषण

सिंधुदुर्गमधील सात आपत्तीप्रवण ठिकाणी यंत्रणांच्या प्रतिसाद क्षमतेची पाहणी

डिजिटल पुणे    02-10-2026 10:33:36

मुंबई : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि विविध आपत्ती प्रतिसाद यंत्रणांनी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये संयुक्त बहुराज्यीय चक्रीवादळ रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात बहुआपत्तीप्रवण ठिकाणी चक्रीवादळाच्या अनुषंगाने यंत्रणांची तयारी आणि प्रतिसाद क्षमतेची पाहणी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, आचरा, रेडी पोर्ट, श्रीरामवाडी, शेळपी, विजयदुर्ग आणि तांबळडेग येथे मुसळधार पाऊस, वादळी वारे, समुद्राची खळबळ, धूप, पूर, झाडे पडणे, विजेच्या खांबांचे नुकसान तसेच रस्ते व रेल्वे संपर्क खंडित होणे अशा विविध आपत्कालीन परिस्थिती कृत्रिमरीत्या निर्माण करण्यात आल्या.

जिल्ह्यात चक्रीवादळ धडकल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून भारतीय हवामान विभागाचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्कालीन नियंत्रण केंद्र सक्रिय करून परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सर्व विभागांच्या कार्यवाहीत समन्वय साधला.

संबंधित विभाग आणि प्रतिसाद यंत्रणांनी अधिसूचित घटना प्रतिसाद प्रणालीचा प्रभावी वापर केला. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या जिओ-डिसिजन सपोर्ट सिस्टीम (Geo-DSS) आधारित वेब-अॅप्लिकेशनमुळे आपत्तीग्रस्त नागरिक, टीम कमांडर, प्रशासन आणि शासनाची डेटाआधारित निर्णय घेण्याची क्षमता अधिक बळकट झाली.

महसूल, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जलसंपदा, परिवहन व बंदरे, ग्रामविकास, नगरपंचायत, औद्योगिक महामंडळ, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मत्स्य विभाग आणि रेडी पोर्ट प्राधिकरणासह विविध विभागांनी या तालमीत सहभाग घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आपदा मित्र, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, गृह रक्षक दल, एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे स्थानिक समुदायाची आपत्ती प्रतिसाद क्षमता वृद्धिंगत झाली तसेच प्रत्येक घटकाला आपत्तीच्या काळातील जबाबदारी स्पष्ट झाली.

अशा रंगीत तालमींमुळे विविध आपत्तींच्या काळात नागरिक, शासकीय मालमत्ता, पशुधन आणि संसाधनांचे अधिक प्रभावी संरक्षण करण्यासह समन्वित प्रतिसाद क्षमता वाढवून संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कमांडंट आदित्य कुमार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहसचिव मुग्धा धुरी, जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य डॉ. मोहन दहिकर, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे समन्वयक बालाजी व्हरकट, प्रकल्प संनियंत्रण गटाचे सागर वळंजू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती