पुणे : सहलीसाठी दिवेआगर येथे गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विनर्स अकॅडमी फॉर ११वी-१२वी सायन्समधील विद्यार्थी सहलीसाठी रायगड जिल्ह्यात आले होते. समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.आळंदीतील अकॅडमीचे ४८ जणांचे पथक रायगड किल्ला आणि दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. या पथकात २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. यावेळी भरती सुरू असताना काही विद्यार्थी समुद्रात उतरले.
समुद्रात उतरल्यानंतर सुरुवातीला दोन विद्यार्थी खोल पाण्यात अडकले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य विद्यार्थ्यांनाही पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते अडचणीत सापडले. विद्यार्थ्यांचा आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
३० ते ३५ विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक आणि स्थानिकांनी समुद्रात धाव घेतली. तत्परतेने केलेल्या बचावकार्यात सुरुवातीला सुमारे ३० ते ३५ विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र, आणखी आठ विद्यार्थी समुद्रात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला.
अवघ्या पाच मिनिटांत बाहेर काढले, पण...
जीवरक्षकांनी पाण्यात उतरून अवघ्या पाच मिनिटांत या आठही विद्यार्थ्यांना समुद्राबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती. विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात मोठ्या प्रमाणात पाणी आणि वाळू गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
कमी वर्दळीच्या भागात विद्यार्थी समुद्रात उतरले
विद्यार्थी मुख्य पर्यटनस्थळापासून काही अंतरावर असलेल्या तुलनेने कमी वर्दळीच्या किनाऱ्यावर समुद्रात उतरल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी समुद्राची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज विद्यार्थ्यांना आला नसावा. भरतीच्या वेळी समुद्रात उतरणेही दुर्घटनेचे महत्त्वाचे कारण ठरल्याचे प्राथमिक माहितीतून दिसून येते.
या दुर्घटनेत राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.