सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 राज्य

दिवेआगरच्या समुद्रात नेमकं काय घडलं? अचानक आलेल्या लाटेने विद्यार्थ्यांना खेचलं; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम

डिजिटल पुणे    02-10-2026 12:39:14

रायगड : दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या आळंदी येथील विद्यार्थ्यांच्या गटावर गुरुवारी काळाने घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अखेर सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या दुर्घटनेनंतर बचावकार्यात सहभागी असलेल्या महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे भाऊ साळुंखे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू होता.

सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले, आठवा विद्यार्थी तासभरानंतर सापडला

भाऊ साळुंखे यांच्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना दुर्घटनेची माहिती मिळाली. पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्याला वेग देण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर सात विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र आणखी एक विद्यार्थी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर सुमारे तासभर शोधमोहीम राबवल्यानंतर आठव्या विद्यार्थ्याचाही मृतदेह शोधण्यात यश आले.या सहलीत ४७ विद्यार्थी आणि तीन शिक्षक सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला.

समुद्रातील खड्ड्याचा अंदाज आला नाही; मोठ्या लाटेने पायाखालची वाळूच सरकली

दुर्घटनेतून बचावलेल्या एका विद्यार्थ्याने त्या भयावह क्षणांचा अनुभव सांगितला. त्याच्या माहितीनुसार, काही विद्यार्थी समुद्रकिनारी होते, तर काही जण पाण्यात उतरले होते. पोहता येणारे विद्यार्थी तुलनेने पुढे गेले होते. त्यांच्यासोबत शिक्षकही असल्याचे सांगण्यात आले.

मात्र समुद्रातील एका खड्ड्याचा अंदाज विद्यार्थ्यांना आला नाही. अचानक मोठी लाट किनाऱ्याकडे आली आणि विद्यार्थ्यांच्या पायाखालची वाळू वाहून गेली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात खेचले गेले. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना स्वतःचा बचाव करणे कठीण झाले.बचावलेल्या विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांना पोहता येत होते. त्यांनी धाडस दाखवत प्रयत्न केले आणि चार विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश मिळवले.

पावसामुळे समुद्रात खड्डा निर्माण झाल्याची शक्यता

स्थानिकांच्या माहितीनुसार, दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडण्याची अशी मोठी घटना यापूर्वी घडली नसल्याचे सांगितले जात आहे. महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे भाऊ साळुंखे यांनीही दिवेआगरचा समुद्रकिनारा साधारणपणे सुरक्षित मानला जात असल्याचे सांगितले.त्यांच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे २० वर्षांत अशा प्रकारची दुर्घटना त्यांच्या निदर्शनास आलेली नाही. मात्र यंदा पावसामुळे समुद्रकिनाऱ्याच्या भागात खड्डा तयार झाला होता. याच ठिकाणी अचानक मोठी लाट आली आणि पायाखालची वाळू वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यातूनच ही हृदयद्रावक दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे दिवेआगरसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुद्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती