पुणे : भारताच्या विविध भागांतील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वस्त्रपरंपरा, कापड आणि हस्तकलेचा परिचय करून देणाऱ्या ‘दस्तकारी हाट’ वस्त्रप्रदर्शनाला बाणेर येथे पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी उदघाटन झाले.६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत बाणेर येथील सफा बँक्वेट्स, हाय स्ट्रीट, लक्ष्मणनगर येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.दि. ६ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
‘जिथे धागे परंपरेला जोडतात’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात भारताच्या विविध राज्यांमधील पारंपरिक वस्त्रे, कापड आणि हस्तकलेच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आसाम, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, बनारस, कर्नाटक, काश्मीर, कोलकाता, राजस्थान आणि पंजाब आदी विविध प्रदेशांतील वस्त्रपरंपरेचे वैविध्य या प्रदर्शनातून अनुभवता येत आहे.
५० हून अधिक दालनांमधून विविध प्रकारचे पारंपरिक कापड, वस्त्रे आणि हस्तकलेच्या वस्तू पाहण्याची तसेच खरेदी करण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पारंपरिक विणकाम, नक्षीकाम, रंगसंगती आणि कारागिरांची कलाकुसर हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.नवरात्र आणि दसऱ्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक भारतीय वस्त्रांना आणि कारागिरांच्या कलाकुसरीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रांतांतील वस्त्रपरंपरा आणि हस्तकलेचा थेट अनुभव घेता येत असल्याने प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.