सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 शहर

इंद्रायणीही गहिवरली! आठ विद्यार्थ्यांना अश्रूंनी अखेरचा निरोप; आळंदी शहर शोकसागरात

डिजिटल पुणे    03-10-2026 13:43:35

आळंदी : दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने आळंदी शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहलीसाठी गेलेल्या ‘विनर्स अकॅडमी’च्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या आठही विद्यार्थ्यांवर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. आळंदीत चार, केळगाव येथे दोन, तर मातापूर आणि वायगाव येथे प्रत्येकी एका विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार झाले. कोवळ्या वयातील आठ जीवांच्या अकाली जाण्याने संपूर्ण आळंदी शोकसागरात बुडाली.

दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर सहलीचा आनंद काही क्षणांतच आक्रोशात बदलला. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आठही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. स्वतंत्र रुग्णवाहिकांमधून पार्थिव आळंदी आणि संबंधित गावांकडे रवाना करण्यात आले.

रुग्णवाहिका घरासमोर पोहोचताच नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आपल्या लेकराचा निष्प्राण चेहरा पाहून आई-वडील, आजी-आजोबा आणि भावंडांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. घराघरांत आणि परिसरात शोककळा पसरली होती.

आळंदीत एकामागून एक चिता पेटल्या

आळंदीच्या स्मशानभूमीत सकाळपासूनच शोकाकुल वातावरण होते. सुमीत भरत अहिरे आणि तन्मय दत्तात्रेय वहिले यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर प्रणव रामदास बनसोडे आणि कैवल्य सतीश वासनकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दोघांच्याही अंत्यविधीवेळी नातेवाइकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

कौस्तुभ संदीप दौंड याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी मातापूर येथे नेण्यात आले. तेथेही ग्रामस्थांनी अश्रूंनी त्याला अखेरचा निरोप दिला. यश किरण वानखेडे याच्यावर वायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले यांच्यावर केळगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

‘पोटचा गोळा गेला, आता आधारच हरवला...’

मुलांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारी ही मुले अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. ‘पोटचा गोळा गेला, आता आधारच हरवला,’ अशी व्यथा पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आळंदी आणि केळगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, दुःखाच्या या प्रसंगी कोणाच्याही डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.

९ ऑक्टोबरला दशक्रिया विधी

आळंदीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या सुमीत अहिरे, तन्मय वहिले, प्रणव बनसोडे आणि कैवल्य वासनकर या चार विद्यार्थ्यांचा दशक्रिया विधी ९ ऑक्टोबर रोजी एकत्रित करण्यात येणार असल्याची माहिती स्मशानभूमीत देण्यात आली.

विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षिकेलाही अश्रू अनावर

विद्यार्थ्यांच्या निधनाने त्यांच्या शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. ‘हे विद्यार्थी अत्यंत शिस्तप्रिय, सोज्वळ आणि अभ्यासात हुशार होते. त्यांच्यासोबत अशी घटना घडेल, याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती,’ अशी भावनिक प्रतिक्रिया शिक्षिका शुभांगी कदम यांनी दिली.

शुभांगी कदम गेल्या १९ वर्षांपासून आळंदीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ‘विनर्स कोचिंग क्लास अकॅडमी’शी संबंधित विद्यार्थ्यांनाही त्यांनी यापूर्वी शिकवले होते. त्यामुळे दुर्घटनेतील अनेक विद्यार्थी त्यांचे परिचित आणि विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळाल्यापासून त्यांनाही अश्रू अनावर झाले होते. विद्यार्थ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या सकाळपासूनच स्मशानभूमीत उपस्थित होत्या.

प्रियदर्शनी इंग्रजी माध्यम शाळा, ज्ञान साई विद्यालयातील शिक्षिका तसेच ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय गुळवे यांनीही दिवसभर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत उपस्थित राहून दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.

लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती

अंत्यविधीसाठी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदी शहर पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या घराजवळ तसेच शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आठ विद्यार्थ्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण आळंदी हादरली असून, इंद्रायणीच्या काठावरील या शहरावर सध्या केवळ दुःखाची सावली आहे.


 Give Feedback



 जाहिराती