सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 विश्लेषण

डोळ्यांदेखत आठ मित्र लाटांमध्ये हरवले; आता उरल्या फक्त काळीज चिरणाऱ्या आठवणी

डिजिटल पुणे    03-10-2026 14:02:21

आळंदी : दिवेआगरच्या समुद्राने आळंदीतील आठ कुटुंबांचे लाडके चेहरे कायमचे हिरावून घेतले. सहलीच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेली मुले समुद्राच्या लाटांमध्ये अडकली आणि काही क्षणांतच आनंदाचे रूपांतर आक्रोशात झाले. या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मागे राहिल्या त्या त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी आयुष्यभर काळजात सलणाऱ्या आठवणी.‘‘मी समुद्रात गेलो नाही, त्यामुळे वाचलो; पण माझ्या डोळ्यांदेखत माझे आठ मित्र लाटांमध्ये गायब झाले,’’ असे सांगताना सोहम गोविंद गोरे याचा आवाजही थरथरत होता. त्याने दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला.

सोहमच्या माहितीनुसार, समुद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एकूण १६ विद्यार्थी आणि काही शिक्षक समुद्राच्या पाण्यात गेले होते. अचानक समुद्राचे पाणी वाढल्याने काही विद्यार्थी प्रवाहासोबत वाहू लागले. परिस्थिती लक्षात येताच शिक्षक, कोचिंग अकॅडमीचे सर आणि पोहता येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी बचावासाठी धाव घेतली.

बचावाच्या प्रयत्नांत तीन विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. आणखी पाच विद्यार्थी स्वतःहून किनाऱ्यावर परतले. मात्र आठ विद्यार्थी समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेले. काही वेळापूर्वी ज्यांच्यासोबत हसत-खेळत वेळ घालवला, तेच मित्र अचानक डोळ्यांदेखत नाहीसे झाल्याचे दृश्य सोहमसह उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले.

पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या आरडाओरडीनंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ‘‘रात्रभर ज्यांच्यासोबत होतो, ज्यांच्यासोबत अनेक वर्षे शाळेत शिकलो, ते मित्र आता आपल्यात नाहीत, ही गोष्ट स्वीकारणेच कठीण आहे,’’ अशी भावना सोहमने व्यक्त केली.

तन्मयचा ‘पोहोचलो’ म्हणणारा फोन ठरला अखेरचा

तन्मय दत्तात्रेय वहिले दिवेआगरला पोहोचल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कुटुंबीयांना फोन करून आपण सुखरूप पोहोचल्याचे सांगितले होते. मात्र त्याचा हा फोनच कुटुंबीयांसोबतचा अखेरचा संवाद ठरला. त्यानंतर काही तासांतच दुर्घटनेची बातमी आळंदीत पोहोचली आणि वहिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.तन्मय हा दत्तात्रेय वहिले यांचा एकुलता एक मुलगा होता. अभ्यासात हुशार असलेल्या तन्मयच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

इंजिनिअर होण्याचे सुमितचे स्वप्न अधुरे

सुमित भरत अहिरे याचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो मेहनत घेत होता. सहलीला जाण्याबाबत सुमित यावेळी विशेष उत्सुक होता. मात्र हीच सहल त्याच्या आयुष्यातील अखेरची ठरली. सुमितच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजवीरच्या जाण्याने कुटुंबाचा आधारच हरपला

केळगावचे पोलिस पाटील युवराज वहिले यांचा राजवीर हा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्या राजवीरला काळाने अचानक हिरावून नेले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सोहम भांडवलकरच्या जाण्याने कुटुंबावर अंधार

केळगावचा सोहम तुकाराम भांडवलकर हा शेतकरी कुटुंबातील हुशार विद्यार्थी होता. दहावीमध्ये त्याने ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. अभ्यासासोबतच बुद्धिबळातही त्याची चांगली कामगिरी होती. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र या दुर्घटनेने कुटुंबाचे भविष्यच अंधारात ढकलले.

स्मशानभूमीत मित्रांना अखेरचा निरोप

आळंदीतील स्मशानभूमीत सुमित अहिरे, तन्मय वहिले, कैवल्य वासनकर आणि प्रणव बनसोडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शाळेपासून एकत्र असलेल्या या मित्रांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले.दिवेआगरच्या समुद्राने आठ कुटुंबांची स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त केली. काही तासांपूर्वी हास्याने भरलेली सहल आता अश्रूंनी संपली. आठ जीव गेले, पण त्यांच्या आठवणी मात्र कुटुंबीयांच्या मनात कायम जिवंत राहणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती