सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 शहर

नवले पूल परिसरात चेंबर खचले; अपघाताचा धोका वाढला

गजानन मेनकुदळे    05-10-2026 12:02:49

पुणे : नवले पूल परिसरातून वडगावमार्गे कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चेंबर खचल्याने रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच नवले पूल परिसर हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असल्याने रस्त्यावर निर्माण झालेला हा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चेंबर खचलेले असून, त्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या मध्यभागीच हा खड्डा असल्याने वाहनचालकांना तो चुकविताना अचानक वाहनाचा वेग किंवा दिशा बदलावी लागत आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे.

रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशा प्रकाशाची सुविधा नसल्याने खड्डा वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी साचल्यास खड्ड्याची खोली लक्षात न आल्याने धोका आणखी वाढू शकतो.

नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांची नियमित पाहणी करून धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र, चेंबर खचून मोठा खड्डा निर्माण होऊनही संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेने तातडीने या ठिकाणची पाहणी करून खचलेले चेंबर दुरुस्त करावे, खड्डा बुजवावा तसेच भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी चेंबरची योग्य पद्धतीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती