सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 विश्लेषण

साताऱ्यात बापानेच मुलीचा जीव घेतला; पुरावे नष्ट करण्यासाठी AIला विचारलं, ‘काय करू?’ अन् पुढे काय घडलं?

डिजिटल पुणे    06-10-2026 11:36:28

सातारा : साताऱ्यातील गोडोली परिसरात वडिलांनीच आपल्या मुलीची बॅटने मारहाण करून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा तपास सुरू असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीच्या हत्येनंतर आरोपी वडिलांनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी चक्क AIला ‘पुरावे कसे नष्ट करायचे?’ असा प्रश्न विचारल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पुरुषोत्तम कदम असे आरोपी वडिलांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्यानंतर काही वेळाने कदम यांना आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्याची जाणीव झाली. त्यानंतर ते घाबरले आणि जवळपास तीन तास काय करावे, याचा विचार करत होते.

याचदरम्यान त्यांनी मोबाईलवर AIची मदत घेण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्या हातून नकळत मुलीचा खून झाला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी काय करावे?’ असा प्रश्न त्यांनी AIला विचारल्याचे तपासात समोर आले. मात्र, AIने गुन्ह्याचे समर्थन करणारी किंवा पुरावे नष्ट करण्यास मदत करणारी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला दिला.

AIकडून मदत नाकारल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

AIकडून मदत मिळाली नाही, त्यानंतर आरोपीने स्वतःच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मुलीच्या रक्ताने माखलेला टी-शर्ट काढून तो वॉशिंग मशीनमध्ये तब्बल तीन वेळा धुतल्याचे सांगितले जात आहे. तसेच घरातील फरशीवर पडलेले रक्ताचे डागही पाण्याने साफ करण्यात आले.

यानंतर रक्ताचे डाग असलेली बॅट घराच्या टेरेसवर नेऊन ठेवण्यात आली. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी आरोपीने मुलगी स्वतःच डोके भिंतीवर आपटून जखमी झाल्याची खोटी माहिती दिल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

पोलिसांना संशय; तपासात हत्येचा उलगडा

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घटनेबाबत संशय आला. घराची पाहणी करताना भिंतीवर रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता टेरेसवर रक्ताने माखलेली बॅट आढळून आली. या पुराव्यांवरून पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनीच मुलीवर बॅटने प्रहार केल्याचे समोर आले.

टीव्हीच्या आवाजावरून वाद; संतापाच्या भरात बॅटने प्रहार

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रात्री टीव्हीच्या आवाजावरून घरात वाद झाला होता. या वादादरम्यान मृत मुलीने आपल्या लहान बहिणीच्या डोळ्यावर मारहाण केल्याचे समोर आले. त्यामुळे संतापलेल्या पुरुषोत्तम कदम यांनी मुलीच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला.

घटनेनंतर सुरुवातीला वेगळी कहाणी सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासात घटनास्थळावरील पुरावे आणि इतर बाबी तपासल्यानंतर हत्येचे गूढ उकलले.या प्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती