सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड
  • जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
  • शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 विश्लेषण

एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री; विद्यार्थ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितली वस्तुस्थिती, म्हणाले, ‘अध्यक्षांना हटवणे सरकारच्या हातात नाही…’

डिजिटल पुणे    06-10-2026 13:34:23

पुणे : एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनस्थळी राज ठाकरे पोहोचले. यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांवर परखड भूमिका मांडली.राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केवळ आंदोलनाच्या भावनेतून निर्णय घेण्याऐवजी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा सल्ला दिला. ‘उपोषण हा मार्ग नाही. प्रश्न नेमका काय आहे, तो कुठे अडकला आहे आणि त्यावर कायदेशीर मार्गाने तोडगा कसा काढता येईल, यासाठी आपण प्रयत्न करूया,’ असे त्यांनी सांगितले.

‘MPSC अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही’

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. यावर राज ठाकरे यांनी घटनात्मक प्रक्रियेचा दाखला देत अध्यक्षांना थेट राज्य सरकार हटवू शकत नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.‘MPSC अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी ठरावीक घटनात्मक प्रक्रिया आहे. राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे केवळ राज्य सरकारच्या निर्णयाने अध्यक्षांना हटवता येत नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘सरकार बदललं तरी ७० हजार पदांची भरती होणार नाही’

राज ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या अपेक्षांबाबतही स्पष्ट भाष्य केले. केवळ सरकार बदलल्यामुळे ७० हजार पदांची भरती तातडीने होईल, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘दुसरे कोणतेही सरकार आले तरी ७० हजार पदांची भरती होणार नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्या,’ असे राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.त्यांच्या या विधानामुळे आंदोलनस्थळी राजकीय आश्वासनांपेक्षा वास्तव परिस्थितीवर चर्चा रंगली.

‘आपण बोलतो ते कटू असतं, पण नंतर वस्तुस्थिती समजते’

राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या भूमिकेचाही संदर्भ दिला. २०२३ मध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मंचावरही आपण परिस्थितीचे वास्तव स्पष्ट केले होते, असे त्यांनी सांगितले. आरक्षणाचा प्रश्न केवळ आंदोलन किंवा व्यासपीठावरून सुटणार नसून त्यासाठी न्यायालयीन आणि घटनात्मक प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, अशी भूमिका त्यावेळी मांडल्याचे त्यांनी नमूद केले.‘आपण जे बोलतो ते अनेकदा कटू असतं; मात्र हळूहळू लोकांना त्यामागची वस्तुस्थिती समजते,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थी प्रतिनिधींना मुंबईत चर्चेसाठी बोलावले

एमपीएससीच्या प्रश्नावर पुढील चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना मुंबईत येण्याचे आवाहन केले. ९ किंवा १० ऑक्टोबरला विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबईत यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील मार्ग काढण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले आहे.

फडणवीस सरकारची राज्यपालांकडे शिफारस

दरम्यान, एमपीएससीच्या माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे शिफारस केली आहे.संविधानाच्या कलम ३१७ नुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल मागवावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. समितीच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पुण्यात तीन ठिकाणी आंदोलन; परीक्षेच्या पद्धतीवरही मतभेद

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलनाचा सहावा दिवस सुरू आहे. एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थी आणि काही राजकीय नेते आंदोलनाला बसले आहेत.याशिवाय शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोरही काही परीक्षार्थींनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्याची मागणी आहे. तर अलका टॉकीज चौकातील आंदोलक विद्यार्थ्यांकडून डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करण्यात येत आहे.पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीवरून आधीच नाराज असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता राज ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे नवा राजकीय रंग आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार आणि आयोगाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि या आंदोलनातून ठोस तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती