सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड
  • जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
  • शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 शहर

एमपीएससी आंदोलनावर पोलिसांची कारवाई; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

डिजिटल पुणे    06-10-2026 13:48:27

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याने पोलिसांनी आयोजकांना आंदोलन थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरू राहिल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातील एस. एम. जोशी पूल, लोकमान्य टिळक चौक आणि शास्त्री रस्ता या तीन ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. MPSCच्या परीक्षा पद्धतीतील बदल, आयोगाचा कारभार आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ५१ विद्यार्थी आणि २९ खासगी शिकवणी तसेच अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याने आयोजकांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही आंदोलन सुरू राहिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आंदोलनस्थळांवरील परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, तेथील चित्रीकरण आणि अन्य माहितीही संकलित करण्यात आली आहे. या माहितीची पडताळणी केल्यानंतर संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

विनापरवानगी ड्रोन चित्रीकरणाचाही तपास

दरम्यान, नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनाचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पोलिसांची परवानगी न घेता ड्रोनचा वापर करण्यात आल्याने याप्रकरणीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. ड्रोनचा वापर नेमका कोणी केला, याचा शोध घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले असून, परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांकडून आंदोलनस्थळी विशेष लक्ष ठेवले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती