पुणे : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता शिवसेनेनेही मंगेश चिवटे यांना ‘एबी’ फॉर्म देत निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चिवटे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “आमदार झाल्यानंतर एका वर्षाच्या आत शिक्षकांचे तीन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याला माझे प्राधान्य असेल. हे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असून, तोपर्यंत आमदारकीचे मानधनही स्वीकारणार नाही,” असे चिवटे यांनी सांगितले.
आपली राजकीय पार्श्वभूमी स्पष्ट करताना चिवटे म्हणाले की, आपण कोणत्याही शिक्षणसम्राटाच्या कुटुंबातून आलेलो नसून सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील कार्यकर्ता आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या हक्कांसाठी तसेच टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या माध्यमातून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांशी थेट संपर्क साधला असून, सुमारे २२ हजार शिक्षक मतदारांची नोंदणी केल्याचा दावा चिवटे यांनी केला. जुनी पेन्शन योजना, प्रचलित नियमांनुसार टप्पा वाढ आणि शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना हे तीन प्रमुख प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, महायुतीच्या प्राथमिक चर्चेत नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे, तर संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याबाबत चर्चा झाली होती.
पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा सुरुवातीपासूनच दावा असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षाने मंगेश चिवटे यांना ‘एबी’ फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपनेही कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे.
महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन ९ तारखेपर्यंत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.