पुणे, नऱ्हे-आंबेगाव : काही वर्षांपूर्वी ओसाड आणि रखरखीत दिसणारी नऱ्हे-आंबेगाव परिसरातील टेकडी आज हिरवाईने नटलेली दिसत आहे. काही मॉर्निंग वॉकर्सच्या मनात २०१७ मध्ये आलेल्या ‘या टेकडीवर झाडे असती तर किती सुंदर दिसले असते!’ या साध्या विचारातून सुरू झालेला प्रवास आज एका व्यापक लोकसहभागी निसर्गसंवर्धन चळवळीत रूपांतरित झाला आहे.

झाडे लावा झाडे जगवा फाऊंडेशन’च्या माध्यमातून २४ जून २०१८ रोजी या परिसरात पहिली वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता झाडे जगविणे, पाणीसंधारण, मृदसंधारण आणि जैवविविधता संवर्धन यावर सातत्याने भर देण्यात आला. आज या परिसरात २३ हजारांहून अधिक वृक्ष, ५०० हून अधिक झुडपे, ६० हून अधिक वेली, १०० हून अधिक फुलझाडे आणि १८३ हून अधिक देशी वनस्पती प्रजातींचे संवर्धन झाले आहे.

या हिरवाईसोबत परिसरातील जैवविविधतेतही लक्षणीय वाढ झाली असून ७२ हून अधिक पक्षी प्रजाती, ४२ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती, विविध पतंग, चतुर आणि वन्यजीव येथे आढळून येत आहेत. त्यामुळे एकेकाळची ओसाड टेकडी आता हळूहळू जैवविविधतेच्या आश्रयस्थानात रूपांतरित होत आहे.
‘झाडे लावण्यापेक्षा झाडे जगविण्यावर भर’
या उपक्रमाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणानंतर झाडांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सातत्याने घेण्यात आली आहे. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र कमतरता असतानाही टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या, भूमिगत पाइपलाइन, सेंद्रिय खत, नियमित देखभाल तसेच आगीमुळे नुकसान झालेल्या रोपांचे पुनरुज्जीवन आणि पुनर्रोपण अशी विविध कामे स्वयंसेवकांकडून केली जात आहेत.

आज परिसरात २३ पाण्याच्या टाक्यांद्वारे सुमारे १.१० लाख लिटर पाणीसाठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. टेकडीच्या विविध भागांत पाणी पोहोचविण्यासाठी सुमारे ७५०० ते ८००० फूट भूमिगत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पाणीसंधारणासाठी शेततळीही तयार करण्यात आली असून त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करून भविष्यात अधिक प्रभावी पाणीसाठा निर्माण करण्याचे नियोजन आहे.
देशी आणि दुर्मीळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी उभारलेल्या रोपवाटिकेमुळे या उपक्रमाला स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली आहे. येथे दरवर्षी सुमारे ३ हजार रोपे तयार करून त्यांची याच परिसरात लागवड केली जाते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीला अनुरूप देशी वनस्पतींची संख्या वाढविण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
फुलपाखरू उद्यानाचे स्वप्न प्रत्यक्षात
जैवविविधता संवर्धनाच्या या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे साकारलेले फुलपाखरू उद्यान. सुमारे दोन वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात झाली आणि आता त्याचे प्रत्यक्ष रूप साकारले आहे. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यान, नऱ्हे, पुणे येथे या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.

वनविभागाची परवानगी, CSRच्या माध्यमातून मिळालेले आर्थिक सहकार्य आणि निसर्ग अभ्यासकांच्या मार्गदर्शनासोबतच स्वयंसेवकांच्या प्रत्यक्ष श्रमातून हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उद्यानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत टीमने प्रत्यक्ष निरीक्षण, प्रशिक्षण आणि Field Workच्या माध्यमातून वनस्पती व फुलपाखरांच्या अधिवासाचा अभ्यास केला.
या उद्यानात ५० हून अधिक झुडपे, १२ हून अधिक वृक्ष, १८ वेली, कंदवर्गीय वनस्पती, Succulents, शोभेची झाडे, चिखलयुक्त तळे, फुलपाखरांसाठी खाद्य केंद्र, बसण्याच्या जागा आणि Walkway अशा विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. याशिवाय गवत व रानटी हंगामी वनस्पतींच्या क्षेत्रांचेही जतन करण्यात आले आहे.
उद्यानात आतापर्यंत या हंगामात ४२ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती, सुमारे १० पतंग आणि ८ हून अधिक चतुरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मनही येथे आढळून आले आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या अधिवास निर्मितीच्या दिशेने केलेले प्रयत्न योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फुलपाखरू उद्यानाचा उद्देश केवळ फुलपाखरे पाहण्यासाठी उद्यान तयार करणे एवढाच नसून फुलपाखरे, मधमाश्या, पक्षी आणि इतर परागीभवन करणाऱ्या जीवांसाठी नैसर्गिक व अनुकूल अधिवास निर्माण करणे हा आहे.
वृक्षपूजन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
उद्घाटन कार्यक्रमात संस्थेने स्वतः वाढविलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृक्षसंवर्धनाशी संबंधित आज्ञापत्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत पर्यावरणप्रेमींना आदरांजली वाहून करण्यात आली. निसर्गविषयक कविता वाचन, संस्थेच्या कार्याची माहिती, वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले.
गेल्या सात-आठ वर्षांच्या या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था, CSRच्या माध्यमातून मदत करणाऱ्या कंपन्या, सामाजिक संस्था, टेकडीवरील विविध ट्रेकिंग व योगगट, स्वयंसेवक आणि नागरिकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
पुढील लक्ष्य : समृद्ध जंगल आणि ‘Open Nature Classroom’
नऱ्हे टेकडीला भविष्यात अधिक समृद्ध जंगल आणि जैवविविधतेचे आश्रयस्थान बनविण्याचे मोठे उद्दिष्ट आहे. त्यासाठी CCT प्रकल्प, मृदसंधारण, शेततळ्यांची दुरुस्ती, पाणीसाठा वाढविणे, आवश्यक ठिकाणी संरक्षणात्मक भिंत, Gliricidiaचे नियोजन, स्मृती वन, वृक्ष परिचय केंद्र, Shrub Garden, Cactus Garden, Grass Land आणि Composting प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.
याशिवाय ही टेकडी भविष्यात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘Open Nature Classroom’ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गात राहून झाडे, वनस्पती, पक्षी, फुलपाखरे, वन्यजीव, माती, पाणी आणि जैवविविधतेचा अभ्यास करता यावा, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे.
या सर्व विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असून लोकसहभाग आणि CSRच्या माध्यमातून पुढील कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज या टेकडीवर २३ हजारांहून अधिक वृक्ष उभे आहेत; मात्र हे यश अंतिम टप्पा नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. या झाडांना जगविणे, त्यांची संख्या आणि विविधता वाढविणे, पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि त्यांच्यासोबत पक्षी, फुलपाखरे, कीटक व वन्यजीवांचा अधिवास विकसित करणे हे पुढील मोठे आव्हान आहे.
एकेकाळी ओसाड असलेली टेकडी आज हिरवीगार झाली आहे. हजारो रोपे, लाखो लिटर पाणी, असंख्य श्रमाचे तास आणि स्वयंसेवकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून हा बदल घडला आहे. हा केवळ २३ हजार झाडांचा प्रवास नाही; हा हजारो जीवांना मिळालेल्या नव्या अधिवासाचा, परतलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आणि फुलपाखरांच्या रंगांनी खुललेल्या निसर्गाचा प्रवास आहे.
वृक्षारोपणापासून वृक्षसंवर्धनाकडे… वृक्षसंवर्धनापासून समृद्ध जैवविविधतेकडे आणि आता समृद्ध जंगलाकडे — नऱ्हे टेकडीची ही निसर्गवाटच पुढील पिढीसाठी आशेचा हिरवा संदेश ठरत आहे.