लडाख बाइक ट्रिप — स्वप्नांच्या पलीकडचा प्रवास
काही प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाहीत…ते आपल्याला स्वतःचीच एक नवी ओळख करून देतात.
लडाखची बाइक ट्रिप आमच्यासाठी असाच एक प्रवास होता.
वर्षानुवर्षे हिमालय, त्यातील उंच पर्वत, खडतर रस्ते, बर्फाच्छादित खिंडी आणि जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड — Umling La (19,024 ft) — याबद्दल ऐकत आलो होतो. एक दिवस स्वतःच्या बाइकवरून तिथे पोहोचायचं, हा विचार मनात घर करून बसला होता.
आणि अखेर २० सप्टेंबर २०२६ रोजी त्या स्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मी, माझी पत्नी प्रियांका, माझा मामे भाऊ मयूर आणि प्रियांकाचे आते भाऊ सागर दादा यांच्या साथीने चंदीगड कडे प्रस्थान केले.
⸻
Chandigarh ते Himalayas — स्वप्नाची सुरुवात
पुण्याहून विमानाने Chandigarh येथे पोहोचलो. पहाटेची वेळ होती. पुढे हजारो किलोमीटरचा प्रवास आणि त्याहून मोठं आव्हान आमची वाट पाहत होतं.
आमच्या bikes आधीच transport करून Chandigarhला पाठवल्या होत्या. सकाळचा नाश्ता करून bikes ताब्यात घेतल्या आणि खऱ्या अर्थाने आमचा हिमालयीन प्रवास सुरू झाला.
Chandigarh → Pathankot → Jammu → Srinagar…
श्रीनगर मुक्काम थोडा मोठा घेतला. तेथील स्थानिक सौदर्याचा अनुभव घेतला. तिथे Dal Lake, Mughal Garden आणि Zero Bridge या स्थळांना भेटी दिल्या. पुढच्या दिवशी कारगिल कडे प्रस्थान केले.
मैदानी भाग मागे पडत गेला आणि हळूहळू हिमालय जवळ येऊ लागला.
या प्रवासात एक नियम सुरुवातीपासून पक्का होता —रात्रीचा प्रवास नाही.
दिवस लवकर सुरू करायचा आणि आपल्या इतर साथीदारांचा bikeच्या mirrorमध्ये चेहरा दिसत नसेल, तर थांबायचं.
हिमालयात वेगापेक्षा आपले साथीदार आणि सुरक्षितता महत्त्वाची.
⸻
Srinagar ते Kargil — हिमालयाचा खरा परिचय
सुमारे 5,200 ft उंचीवर असलेल्या Srinagarनंतर वातावरण पूर्णपणे बदललं.रस्ते अरुंद झाले, पर्वत उंच झाले आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं नवं रूप दिसू लागलं.यानंतर आम्ही Zoji La — 11,649 ftच्या दिशेने निघालो.
Zoji La पार करताना जाणवलं की आता आपण खऱ्या अर्थाने हिमालयात प्रवेश केला आहे. Zoji La pass हे लडाख चे प्रवेशद्वार.
पण या प्रवासात एक असा क्षण आला, ज्याने हिमालयाच्या सौंदर्याबरोबरच भारतीय सैन्याची ताकदही जवळून अनुभवायला दिली.
Kargil War Memorialला पोहोचण्याआधी डोंगररांगांमध्ये एका ठिकाणी भारतीय सैन्याकडून तोफांचा सराव सुरू असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
दूरवरच्या डोंगरांमध्ये अचानक घुमणारा त्या तोफांचा आवाज…प्रत्येक धडाड मनात एक वेगळीच धडकी भरवत होती.तो आवाज केवळ कानावर पडत नव्हता, तर हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमधून प्रतिध्वनीत होत थेट मनापर्यंत पोहोचत होता.
क्षणभर त्या परिसरातील शांतता भंग करणारा तो आवाज भीतीदायक वाटला… पण त्याच क्षणी मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली —
अभिमानाची.
आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांची तयारी किती कठोर आणि सतत सुरू असते, याची जाणीव त्या क्षणी झाली.
आपण पर्यटक म्हणून ज्या पर्वतरांगांमधून प्रवास करत होतो, त्याच पर्वतरांगांमध्ये आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र सज्ज होते.त्या तोफांच्या प्रत्येक आवाजासोबत मनात एकच भावना निर्माण होत होती —
“आपण सुरक्षित आहोत, कारण कुठेतरी या उंच पर्वतांमध्ये आपले जवान जागे आहेत.”आणि याच भावनेने आम्ही पुढे Kargil (सुमारे 8,780 ft) कडे निघालो.
⸻
Kargil War Memorial — शौर्याला सलाम
Kargil War Memorialला पोहोचलो.
कारगिल युद्धातील जवानांच्या आठवणी, त्यांच्या कुटुंबीयांना लिहिलेली पत्रं आणि देशासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान वाचताना मन अक्षरशः हेलावून गेलं.
काही वेळापूर्वी डोंगरांमध्ये ऐकू आलेल्या तोफांच्या आवाजाची आठवण अजूनही मनात ताजी होती.आणि आता त्या आवाजामागचं वास्तव अधिक स्पष्ट झालं होतं.
आपण ज्या रस्त्यांवर adventure म्हणून फिरत होतो, त्याच पर्वतरांगांमध्ये आपल्या सैनिकांनी देशासाठी जीवाची बाजी लावली होती.त्या क्षणी बाइक राईडपेक्षा देश आणि आपल्या जवानांबद्दलचा अभिमान अधिक मोठा वाटला.
⸻
Kargil ते Leh — प्रत्येक किलोमीटर एक अनुभव
Kargilनंतर आमचा प्रवास आणखी उंचीच्या दिशेने सुरू झाला.
पहिला मोठा टप्पा होता —
Namika La — 12,198 ft
त्यानंतर — Fotu La — 13,479 ft प्रत्येक pass पार करताना शरीराला जाणवणारी उंची वाढत होती आणि डोळ्यांसमोरचा landscape अधिक अविश्वसनीय होत होता.यानंतर Lamayuru — सुमारे 11,500 ft.
Lamayuruचे चंद्रासारखे दिसणारे पर्वत, खोल दऱ्या आणि रंग बदलणारे डोंगर पाहताना अनेक वेळा बाइक थांबवावीशी वाटत होती.पण पुढे Leh आमची वाट पाहत होतं.
शेवटी आम्ही पोहोचलो —
Leh — 11,562 ft.
Lehमध्ये पोहोचल्यानंतर Leh Palace, Shanti Stupa आणि Hall of Fameला भेट दिली.
Hall of Fameमध्ये आपल्या जवानांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती पाहताना पुन्हा एकदा मन अभिमानाने भरून आलं.
Lehमध्ये फिरताना साध्या चढावर किंवा पायऱ्या चढतानाही श्वास जड होत होता.समुद्रसपाटीपासून 11,562 फूट उंचीवर शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.
⸻
Leh ते Nubra — Khardung Laचा थरार
Lehनंतर आमचा प्रवास जगप्रसिद्ध Khardung La — 17,982 ftच्या दिशेने सुरू झाला.ज्या नावाबद्दल वर्षानुवर्षे ऐकलं होतं, त्या खिंडीवर स्वतःच्या Royal Enfieldवर उभं राहण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.
इतक्या उंचीवर हवा विरळ झाली होती, तापमान कमी झालं होतं आणि प्रत्येक श्वासाची जाणीव होत होती.यानंतर आम्ही Nubra Valley — सुमारे 10,000–11,000 ftच्या परिसरात उतरलो.
पुढे Hunder — सुमारे 10,000 ft.
एका बाजूला उंच, कोरडे पर्वत आणि दुसऱ्या बाजूला वाळवंटासारखी जमीन आणि त्यावर दिसणारे प्रसिद्ध double-humped Bactrian camels.
Hunderच्या sand dunesवर बाइक चालवताना हिमालयाचं आणखी एक वेगळंच रूप दिसलं.
यानंतर Diskit — सुमारे 10,300 ft आणि Diskit Monasteryचा परिसर अनुभवला.
⸻
Wari La — आणखी एका उंचीचा अनुभव
लडाखच्या या प्रवासात प्रत्येक रस्ता आपली परीक्षा घेत होता.त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे —
Wari La — 17,428 ft.
उंच पर्वतरांगा, विरळ हवा आणि अक्षरशः आकाशाला भिडणारा रस्ता.
इथे पोहोचल्यावर जाणवत होतं की आपण फक्त बाइक चालवत नाही आहोत…आपण स्वतःच्या मर्यादा तपासत आहोत.
⸻
Pangong Tso — निळाईच्या पलीकडचं जग
यानंतर आमचा प्रवास Chang La — 17,688 ft पार करत Pangongच्या दिशेने सुरू झाला.Chang La पार करताना थंडी आणि उंची दोन्हीची तीव्रता जाणवत होती.
आणि मग…समोर दिसला — Pangong Tso — सुमारे 13,940 ft. .निळं आकाश आणि त्याच्याशी स्पर्धा करणारा निळाशार तलाव पण यावेळी फक्त Pangong पाहायचं नव्हतं. आम्हाला पुढे Merak — सुमारे 14,000 ftपर्यंत जायचं होतं. Pangongच्या किनाऱ्यावर उभं राहून समोर पसरलेला अथांग निळा तलाव पाहताना इतक्या दिवसांचा थकवा क्षणात नाहीसा झाला.
तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट देणंही आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता.हिमालयाच्या या टोकाला महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या आमच्यासाठी हा अनुभव मनाला विशेष स्पर्शून गेला.
⸻
Rezang La — शौर्याला सलाम
Pangongनंतर आमचा प्रवास Rezang La — सुमारे 15,000 ftच्या दिशेने झाला.तिथे असलेल्या Rezang La War Memorialला भेट दिली.
हे ठिकाण केवळ पर्यटनस्थळ नाही.१९६२च्या युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची ही साक्ष आहे.
Rezang Laला अनेकदा “Ahir Dham” म्हणूनही संबोधलं जातं.त्या उंच, निर्जन आणि कठोर पर्वतरांगांमध्ये उभं राहून त्या सैनिकांच्या शौर्याचा विचार केला की अंगावर काटा येतो.
Himalayasमध्ये बाइक चालवताना आपल्याला ज्या परिस्थिती कठीण वाटतात, त्यापेक्षा कितीतरी कठीण परिस्थितीत आपल्या जवानांनी देशाचं रक्षण केलं होतं.
⸻
Hanle — जगापासून दूर, आकाशाच्या जवळ यानंतर आमचा प्रवास पोहोचला —
Hanle — सुमारे 14,700 ft.
Hanle हा या प्रवासातील माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ठरला.रस्ते संपल्यासारखे वाटणारे प्रदेश, दूरवर पसरलेले पर्वत आणि रात्री अक्षरशः डोक्यावर उतरलेलं आकाश…
Hanleमध्ये रात्रीचा अनुभव अविस्मरणीय होता.
शहरांमध्ये प्रकाशामुळे हरवलेलं आकाश इथे पुन्हा दिसतं.विशेषतः full moonच्या आसपास हिमालयाचं landscape एका वेगळ्याच रूपात दिसत होतं.पण या प्रवासाचा खरा climax अजून बाकी होता.
Umling La.
⸻
Umling La — स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण
Umling La…19,024 ft.जगातील सर्वात उंच मोटरेबल रोडवर आपल्या Royal Enfieldवरून पोहोचण्याचं स्वप्न आम्ही अनेक दिवसांपासून पाहत होतो.
पण हा प्रवास सोपा नव्हता.Umling Laकडे जाणारा रस्ता काही दिवस आधी झालेल्या जोरदार snowfallमुळे बंद होता. अनेक ठिकाणी black ice होतं.Pangongवर असताना क्षणभर मनात विचार आला —
“इथून परत जावं का?”पण स्वप्न अपूर्ण सोडायचं नव्हतं.
दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. Frozen mountainsमधून ride केली. नदीचे water crossings पार केले. काही ठिकाणी off-roading केलं. Norbule Top पार केला.
प्रत्येक किलोमीटरसोबत वातावरण अधिक कठीण होत होतं.ऑक्सिजन कमी, थंडी जास्त आणि रस्ता अधिक आव्हानात्मक.
बाईक मधील इंधनाच्या ज्वलनासाठीदेखील हवेतील ऑक्सीजन लागतो . त्याची देखील कमतरता प्रत्येक किलोमीटरगणिक जाणवत होती. तरी देखील आमच्या बाईक्सनी शेवटपर्यंत साथ नाही सोडली.पण अखेर…समोर Umling Laचा फलक दिसला.त्या क्षणी काही सेकंदांसाठी सगळं शांत झालं.
19,024 फूट.
ज्या ठिकाणाबद्दल इतके दिवस स्वप्न पाहिलं होतं, तिथे आम्ही आमच्या bikesसह उभे होतो.तो फक्त एका passवर पोहोचण्याचा क्षण नव्हता.तो स्वतःला दिलेलं एक वचन पूर्ण करण्याचा क्षण होता.
We dreamed about Umling La.
We prepared for it.
We fought for it.
And finally… we made it.
⸻
Umling La ते Hanle — स्वप्न पूर्ण झाल्यानंतरचा प्रवास
Umling Laवरचा तो अविस्मरणीय क्षण मनात साठवून आम्ही पुन्हा **Hanle (सुमारे 14,700 ft)**च्या दिशेने परतलो.
शरीर थकलेलं होतं, पण मन मात्र प्रचंड आनंदात होतं.ज्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न आता पूर्ण झालं होतं.
Hanleला परतल्यानंतर एक वेगळीच शांतता जाणवत होती.काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्यासाठी मनात प्रचंड उत्सुकता होती, तो प्रवास आता एका आठवणीत बदलत होता.
⸻
Hanle ते Leh — परतीच्या प्रवासातील खास भेटी
Hanleहून आम्ही पुन्हा Leh — 11,562 ftच्या दिशेने निघालो.परतीच्या या प्रवासातही Himalayasने आम्हाला अनेक सुंदर आठवणी दिल्या.
लेह ला परतताना वाटेत आम्ही Thiksey Monastery — सुमारे 11,800 ftला भेट दिली.
हिमालयाच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं Thiksey Monastery पुन्हा एकदा पाहताना प्रवासातील सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली.यानंतर आमच्यासाठी एक खास अनुभव होता
“3 Idiots” चित्रपटातील रांचो चे स्कूल
चित्रपटामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्याचा अनुभव वेगळाच होता.
चित्रपटातील आठवणी आणि आपल्या प्रत्यक्ष लडाख प्रवासाच्या आठवणी एकत्र जोडल्या गेल्या.
शेवटी पुन्हा एकदा आम्ही लेह— 11,562 ftला पोहोचलो.आता मात्र प्रवासाचा वेग कमी करण्यापेक्षा आठवणी घेऊन परतीची तयारी सुरू झाली.
लेह मध्ये थोडं शॉपिंग केलं.
स्थानिक वस्तू, आठवणी आणि लडाखची छोटीशी झलक सोबत घेतली.
आम्ही या प्रवासासाठी जेवढं सामान घेऊन आलो होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
⸻
लेह ते कीलाँग — हिमालया मधून मनाली च्या दिशेने
लेह मागे सोडताना मनात एक वेगळीच भावना होती.
इतके दिवस ज्याला आपलं destination मानलं होतं, तो लेह आता मागे पडत होता.
आता पुढचा मार्ग होता —
Leh → Tanglang La → Gata Loops → Baralacha La → Keylong → Manali
प्रवासात आम्ही पुन्हा Tanglang La — 17,480 ft पार केला.त्यानंतर गाटा लूप्स— सुमारे 15,300 ftच्या कठीण hairpin bendsमधून प्रवास केला.

पुढे आला — Baralacha La — 16,040 ft.
उंच पर्वत, थंड वारे, बदलत जाणारे landscape आणि लडाखला मागे सोडण्याची जाणीव…
या सगळ्यांच्या साथीने आम्ही पुढे निघालो.दिवसभराच्या कठीण राईड नंतर आम्ही कीलाँग— सुमारे 10,100 ft येथे मुक्काम केला.शरीराला विश्रांतीची गरज होती आणि मनाला गेल्या काही दिवसांचा प्रवास पुन्हा एकदा आठवण्याची.
⸻
कीलाँग ते मनाली — हिमालयाला निरोप
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बाईक सुरू केल्या. कीलाँग मागे सोडून आम्ही मनाली— सुमारे 6,700 ftच्या दिशेने निघालो.
हळूहळू उंच पर्वत मागे पडत गेले.हवेतला गारवा कमी झाला.झाडांची संख्या वाढू लागली.आणि जाणवलं आपण हिमालया मधून बाहेर पडत आहोत.
मनाली मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही अंजनेय महादेवाच्या पवित्र स्थानी दर्शनासाठी गेलो.हे दर्शन या संपूर्ण प्रवासाच्या शेवटाला मिळालेला एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव होता.
खुल्या आकाशाखाली असलेली महादेवाची पवित्र पिंड आणि तिच्यावर शेकडो फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा…त्या धबधब्याचं पाणी थेट महादेवाच्या पिंडीवर पडत होतं.

डोंगरांच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात आणि सतत कोसळणाऱ्या जलधारेखाली असलेलं ते शिवलिंग पाहताना मन अक्षरशः स्तब्ध झालं.ते दर्शन खरंच अद्भुत होतं.
निसर्ग आणि अध्यात्म यांचा असा सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो.आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे, हिवाळ्यात हा धबधबा पूर्णपणे गोठतो आणि गोठलेल्या पाण्यामुळे महादेवाच्या पिंडीवर एक मोठा बर्फाच्छादित पर्वतासारखा आकार तयार होतो.त्या रूपाची कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात.
हजारो किलोमीटरच्या बाइक प्रवासानंतर महादेवाच्या या पवित्र स्थानी मिळालेलं दर्शन मनाला विलक्षण समाधान देऊन गेलं.मनात एकच भावना होती “हा प्रवास सुखरूप पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.”
⸻

मनाली ते चंदीगढ — एका अविस्मरणीय प्रवासाचा शेवट
मनाली नंतर आमचा शेवटचा टप्पा होता चंदीगढ
ज्या चंदीगढ मधून आम्ही या प्रवासाची सुरुवात केली होती, त्याच Chandigarhकडे आता आम्ही परतत होतो.पण सुरुवातीला ज्या मनःस्थितीत Chandigarh सोडलं होतं, त्यापेक्षा परतताना आम्ही पूर्णपणे वेगळे होतो.
बाइकवर हजारो किलोमीटरचा प्रवास केला होता.असंख्य पर्वत पाहिले होते.अनेक उंच passes पार केले होते.भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जवळून अनुभवले होते.
आणि सर्वात महत्त्वाचं —
19,024 ft उंच Umling Laवर आपल्या स्वप्नाला स्पर्श केला होता