सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 शहर

रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात

डिजिटल पुणे    07-10-2026 11:05:46

पुणे : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आंदोलनाला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसतानाच बुधवारी पहाटेपासून आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या पिंजरा गाड्यांसह शेकडो पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास ‘पुणे बंद’ करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलनस्थळी अचानक बंदोबस्त वाढवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांना हटवण्याची कारवाई होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एस. एम. जोशी पुलावर तब्बल सहा पिंजरा गाड्या तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आंदोलनाला आता कायदेशीर वळणही मिळाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आज कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनकर्त्यांना अलका चौकातून हटवण्याची तयारी?

गेल्या सात दिवसांमध्ये या आंदोलनाला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनीही आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यामुळे आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढत असतानाच अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाल्याने अलका चौक परिसरातून आंदोलनकर्त्यांना हटवण्याची तयारी सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे रोहित पवारांना खुले आव्हान

रोहित पवारांनी पुणे बंदचा इशारा दिल्यानंतर भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘पुणे बंद करून दाखवाच’, असे आव्हान भाजपकडून देण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी आंदोलनस्थळी येणार?

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हेही एमपीएससी आंदोलकांची भेट घेऊ शकतात, असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्या भेटीची अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत राहुल गांधी आंदोलनस्थळी येणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचा वाढता बंदोबस्त, न्यायालयात दाखल झालेली याचिका आणि रोहित पवारांचा पुणे बंदचा इशारा या पार्श्वभूमीवर आज एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती