सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ‘वाणिज्य शाखेतील रोजगारांची संधी’ यावर व्याख्यानाचे आयोजन

डिजिटल पुणे    07-10-2026 13:29:57

पुणे : वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात वाणिज्य व उद्योग क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या विविध नोकरी व रोजगाराच्या संधीवर माहिती मिळावी, या उद्देशाने सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘वाणिज्य आणि करिअर: नवीन क्षितिज’ या विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत AIR म्हणजे All India Rank (अखिल भारतीय क्रमांक) २३ वा क्रमांक मिळवलेले CS आदित्य नायडू यांच्या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय परीक्षा अधिकारी डॉ. सुभाष वाव्हळ, वाणिज्य संशोधन केंद्र समन्वयक डॉ. अमृता इनामदार, कार्यक्रम समन्वयक डॉ. अरबाज सैय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. वंदना पिंपळे यांनी वाणिज्य शिक्षणाचा व्यावहारिक जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या कल्पनांना व्यवसायाच्या संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि जोखीम घेण्याची तयारी ठेवण्याची गरज व्यक्त केली.

वाणिज्य विषयातील करिअरच्या संधीवर भाष्य करताना CS आदित्य नायडू यांनी वाणिज्य विषयाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधींची सविस्तर माहिती देत बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता अतिरिक्त कौशल्ये, व्यावसायिक पात्रता आणि प्रत्यक्ष अनुभव मिळविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, व्यवसायाची निवड, भांडवलाचे व्यवस्थापन, ग्राहकांच्या गरजांची ओळख, बाजारपेठेचा अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाणिज्य शाखेमध्ये पारंपरिक नोकरीच्या संधींबरोबरच बँकिंग, वित्त, करप्रणाली, अकाउंटिंग, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्सी, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील ज्ञानासोबत संवादकौशल्य, नेतृत्वगुण, तंत्रज्ञानाचा वापर, निर्णयक्षमता आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे नमूद करत नोकरी शोधणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे बना असा प्रेरणादायी संदेश दिला.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला वाणिज्य पदवी व पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अरबाज सैय्यद तर आभार प्रदर्शन प्रा. प्रविण खाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतिका जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असून प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.


 Give Feedback



 जाहिराती