पुणे : महाज्योती आणि वनार्टी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण पूर्व परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पुणे आणि नांदेड येथील परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या दोन केंद्रांवरील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. नव्या परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे संस्थांकडून स्पष्ट करण्यात आले.
यूपीएससी, एमपीएससी आणि पोलीस भरतीसह विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून तब्बल 90 हजार 600 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तीन दिवस चालणारी ही परीक्षा 32 शहरांमधील 64 केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी सुमारे 30 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र पुण्यातील सनराईत आंबेगाव आणि नांदेडमधील मराठवाडा ऑनलाइन या दोन केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.
पुण्यात लॉगिनची अडचण, नांदेडमध्ये वीजपुरवठा खंडित
पुण्यातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा प्रणालीमध्ये लॉगिन करता येत नसल्याची समस्या निर्माण झाली. तर नांदेड येथील केंद्रावर वीजपुरवठा खंडित झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. परिणामी दोन्ही केंद्रांवरील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, अशी महत्त्वाची माहितीही महाज्योती आणि वनार्टीकडून देण्यात आली आहे.
केवळ प्रभावित विद्यार्थ्यांचीच फेरपरीक्षा
तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच फेरपरीक्षा आयोजित केली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून नवीन परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अनावश्यक प्रवासाचा त्रास होऊ नये, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे संस्थांनी सांगितले.पुणे आणि नांदेडमधील संबंधित केंद्रांवरील सर्व विद्यार्थ्यांना नवीन तारीख आणि केंद्राची माहिती लवकरच कळवण्यात येणार आहे.
तांत्रिक बिघाडाचा अहवाल मागवला
परीक्षेदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. नेमका बिघाड कशामुळे झाला, याची माहिती अहवालातून स्पष्ट होणार आहे. तपासणीनंतर या प्रकरणात कोणाची चूक किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा संस्थांकडून देण्यात आला आहे.महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे आणि वनार्टीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
उर्वरित परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत
राज्यातील 32 शहरांमध्ये एकूण 64 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. पुणे आणि नांदेडमधील दोन केंद्रांचा अपवाद वगळता इतर सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याचे महाज्योती आणि वनार्टीकडून सांगण्यात आले.यापुढे अशा प्रकारच्या तांत्रिक समस्या उद्भवू नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांची अधिक काटेकोर तपासणी आणि आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असेही संस्थांनी स्पष्ट केले आहे.