सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी ,प्रियंका गांधीं यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 राज्य

‘पद-प्रतिष्ठेपेक्षा देशसेवा मोठी’; 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास सांगताना मोदींचा विकसित भारताचा संकल्प

डिजिटल पुणे    07-10-2026 16:56:26

नवी दिल्ली : देशसेवेच्या प्रवासात पद, प्रतिष्ठा आणि सत्तेपेक्षा राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. सरकारमधील प्रमुख म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय प्रवासाचा आढावा घेतला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण होणे ही कोणत्याही वैयक्तिक उपलब्धीची बाब नसून जनतेच्या आशीर्वादाचे आणि विश्वासाचे फलित आहे. भारतीय लोकशाही, संविधान आणि देशातील जनतेने दिलेल्या संधीमुळेच हा प्रवास शक्य झाला. जनतेसमोर आपण नतमस्तक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘देशासमोर सत्ता सुखाला महत्त्व नाही’

आपल्या कार्याचा उद्देश कधीही पद किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हता, तर देशसेवा हा एकमेव ध्यास असल्याचे मोदी यांनी सांगितले. “मी महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, तर मिशनसाठी जगणारा माणूस आहे. मला जी जबाबदारी मिळाली, ती प्रामाणिकपणे पार पाडत गेलो,” असे त्यांनी नमूद केले.

देशाची सेवा करणे हीच आपली साधना असून कर्माला कर्तव्य मानून काम करत राहणे हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र असल्याचे मोदी म्हणाले. देशासमोर सत्ता, पद किंवा प्रतिष्ठेला कोणतेही महत्त्व नसते. जगाच्या कोणत्याही भागात पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते; मात्र भारतासारखी पुण्यभूमी अन्यत्र मिळू शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जनतेच्या विश्वासाला मोदींचा सलाम

गुजरातपासून दिल्लीपर्यंतच्या प्रवासात जनतेने सातत्याने विश्वास दाखवला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये देशवासीयांनी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. भारतीय जनता पक्ष, एनडीए आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व घटकांप्रतीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.“जनता माझ्यासाठी देवासमान आहे. देशाने मला खूप काही दिले असून त्यामुळे देशाप्रती माझी जबाबदारीही तितकीच मोठी आहे,” असे मोदी यांनी म्हटले.

बुद्धापासून विवेकानंदांपर्यंतच्या विचारांचा वारसा

भारताच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख करताना मोदी यांनी बुद्धापासून स्वामी विवेकानंदांपर्यंतच्या विचारांचा संदर्भ दिला. मानवतेची सेवा, गरीब आणि गरजूंची मदत आणि राष्ट्रसेवा हीच आपली कर्तव्यभावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मर्यादित संसाधने असली तरी देशाची स्वप्ने आणि ध्येय मोठे असले पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला. स्वयंसेवक आणि देशवासीयांच्या सहकार्यामुळे सार्वजनिक जीवनातील प्रवासात आपल्याला सातत्याने बळ मिळाले, असेही त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब

पुढील काळात भारताला अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रभावी राष्ट्र बनवण्याचा संकल्प मोदी यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे, देशातील तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध करून देणे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करणे हा पुढील प्रवासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून विकसित भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

‘अधिक जोमाने देशसेवा करण्याची शक्ती द्या’

आपल्या पुढील वाटचालीसाठी देशसेवेची अधिक शक्ती मिळावी, अशी प्रार्थना आपण केली असल्याचे मोदी यांनी सांगितले. “देशासाठी अधिक जोमाने काम करण्याची आणि देशवासीयांची सेवा करण्याची शक्ती मला मिळावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाकडे वैयक्तिक गौरव म्हणून न पाहता, जनतेने दिलेल्या संधी आणि विश्वासाची जबाबदारी म्हणून पाहत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. पुढील काळातही राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देत देशाच्या विकासासाठी काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती